भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट टीम पाच वनडे व एक ट्वेंटी २० सामना खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चेन्नई येथून रवाना झाला.

दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारतीय संघ श्रीलंकेला त्यांच्या मायभूमीत टक्कर देणार आहे. श्रीलंकेसोबतची मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. २१ जुलै रोजी पहिला वनडे सामना हम्बन्टोट येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर २४, २८, ३१ जुलै व ४ ऑगस्ट रोजी असे एकूण पाच एक दिवशीय सामने होणार आहेत. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहेत. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी एक ट्वेंटी २० चा सामना होणार आहे. या दौऱ्यासाठी उपकर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली असून त्यानंतर जलदगती गोलंदाज विनयकुमार अचानक जखमी झाल्याने त्याच्या जागी संघात अष्टपैलू  इरफान पठणाची निवड करण्यात आली आहे.

श्रीलंकेला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी आठ दिवस कसून सराव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास काहीसा दुणावला आहे. आगामी दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी चांगली राहील, श्रीलंकेविरूद्धची ही मालिका जिंकूनच आम्ही या मौसमाची सुरुवात करणार असल्याचे मत कर्णधार धोनीने चेन्नई येथील विमानतळावर पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Comment