दिग्विजयसिंग आसाम, उत्तर प्रदेश जबाबदारीतून मुक्त

नवी दिल्ली दि.१८ – बोलघेवडेपणात कानफाट्या नाव पडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडील आसाम, उत्तर प्रदेशचे ‘प्रभारी’पद काढून घेतल्याने त्यांना धक्का बसला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर दिग्विजय सिह यांच्या प्रभारी पदावर टांगती तलवार होती.

आता हे प्रभारीपद पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर अलिकडेच दिग्विजय सिंह यांनी जी टिपण्णी केली होती, त्या नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिग्विजय सिंह यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी मोठी जबाबदारी सांभाळू शकतात. वास्तविक पाहता, दिग्विजय सिंह राहुल गांधीच्या जवळच्या वर्तुळातील मानले जातात. मात्र, पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेतल्याचे समजते.

या पूर्वीही सिंह यांनी आपल्या बोलघेवडेपणाने पक्षाला अनेकदा अडचणीत आणले आहे. त्या बद्दल पक्षाने त्यांचे वेळोवेळी कानही उपटले होते. मात्र, राहुल गांधींबाबतच्या त्यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर कारवाई करणे पक्षाला भाग पडले.

दिग्विजय सिंह यांच्या वाचाळपणाचा फटका त्यांनाही बसला आहे. त्यांच्या बेताल बडबडीला कंटाळून ‘दिग्विजय सिह हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत’ असा खुलासाही करण्याची नामुष्की पक्षावर आली होती. त्यामुळे नाराज झालेले सिंह हे प्रणव मुखर्जींना दिलेल्या निरोपाच्या पार्टीतही सहभागी झाले नव्हते.