नवी दिल्ली दि.१८ – कार्बोन या सेलफोन उत्पादक कंपनीने रजनीकांतच्या आगामी चित्रपटासाठी स्पेशल एडिशन सेलफोन काढण्याचे ठरविले असून त्यासाठी या चित्रपटाचे वितरण करणार्या एरॉस आणि मिडीया-वन या वितरक कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत याचा कोचाडैयान हा नवा चित्रपट या वर्षअखेर रिलीज होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असे पाच लाख फोन तयार करण्यात येत आहेत असे समजते.
रजनीकांत स्पेशल सेलफोन व टॅब्लेट
कोचाडैयान या चित्रपटाच्या नावानेच हे मोबाईल विकले जाणार असून त्यात एक्सक्युझिव्ह स्क्रीन सेव्हर व चित्रपटाच्या इमेजेस लोड केल्या जाणार असून चित्रपटाचे ट्रेलर व सिग्नेचर ट्यूनही यात असणार आहे. शिवाय रजनीकांतची सही ही ग्राहकांना मिळणार असून हे मोबाईल सप्टेंबर आक्टोबरमध्ये लाँच करण्यात येणार आहेत. या विशेष एडीशन मोबाईलमध्ये कार्बोन कंपनीचे कांही फिचर फोन तसेच नुकताच लाँच केलेला कार्बन स्मार्ट टॅब १ – कार्बोन स्मार्टफोन यांचाही समावेश करण्यात येणार आहे मात्र त्यांच्यात कांही मॉडिफिकेशन व एकूण रूपात कांही बदल करण्यात येणार आहेत.
कोच्चाडैयान हा अॅक्शन चित्रपट असून तो जेम्स कॅमेरूनचा अवतार अथवा स्पिलबर्गच्या टिनटिन प्रमाणेच असेल. हा चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांत तयार करण्यात येत आहे. यांत रजनीकांत बरोबर दीपिका पदुकोण व जॅकी श्रॉफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत टोकियोत रिलीज करण्यात येत आहे तर प्रिमियर लॉस एंजेलिस, लंडन व भारतात होणार आहेत.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एखादे डिव्हाईस तयार करणे अथवा विकणे ही बाब नवी नसून यापूर्वी शाहरूख खान याने त्याच्या रा-वन चित्रपटासाठीही त्याच नावाचा टॅब्लेट बाजारात आणला होता. मात्र ग्राहकांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.