एचटीसी स्मार्टफोनमध्ये आता मराठीही

नवी दिल्ली, दि. १८ –  स्मार्टफोन वापरणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल उत्पादनात आघाडीवर असलेल्या एचटीसी कंपनीने त्यांच्या अँड्रॉईड प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोन्समध्ये आता भारतीय भाषांची जोड दिली आहे. त्याशिवाय सॅमसंग कंपनीच्या बहुचर्चित गॅलेक्सी नोटची पुढची आवृत्ती गॅलेक्सी `नोट-२’ येत्या ऑगस्टमध्ये बाजारपेठेत येऊन धडकण्याची शक्यता आहे.

एटटीसीच्या यापुढे बाजारात येणार्‍या सर्व स्मार्टफोनमध्ये हिंदी, तमिळ, बंगाली आणि मराठी भाषांची जोड देण्यात येणार आहे. या भाषांमुळे ग्राहकांना या भाषेत एसएमएस किंवा मेल वाचता आणि लिहिता येणार आहेत. चालू वर्षी या कंपनीचे स्मार्टफोन विकत घेतलेल्या विद्यमान ग्राहकांनाही या भाषा कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भाषांचा पॅक गूगल प्लेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे कंपनीचे भारतातील व्यवस्थापक फैसल सिद्दिकी यांनी सांगितले.

एचटीसी कंपनीने आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एचटीसी वन एक्स, एचटीसी वन एस, एचटीसी वन व्ही, डिझायर सी आणि डिझायर व्ही हे स्मार्टफोन्स आणले आहेत. एचटीसी एक्स्प्लोरर आयएस क्यू ४ हा स्मार्टफोन बाजारात आणताना, लवकरच आपल्या फोन्समध्ये भारतीय भाषांचीही जोड देण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केली होती. हे आश्वासन कंपनीने आता पूर्ण केले आहे.

एचटीसी वन आणि डिझायर मालिकेतील सर्व स्मार्टफोन्ससाठी कंपनीतर्फे लवकरच सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येणार आहे. या अपडेटमध्ये हिंदी, मराठी आणि तमिळ भाषा असतील. त्याशिवाय येत्या ऑगस्टमध्ये बंगाली भाषा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सॅमसंगचा गॅलेक्सी नोट-२
सॅमसंग कंपनीतर्फे जर्मनीतील बर्लिन येथे होणार्‍या आयएफए व्यापारी प्रदर्शनामध्ये, भरपूर चर्चा असलेल्या गॅलेक्सी नोट-२ हा ’फॅब्लेट’ बाजारात आणण्याची तयारी चालविली आहे, असे कोरियातील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

कंपनीतर्फे येत्या ३० ऑगस्टला मोठ्या थाटात या स्मार्टफोनचे लॉंचिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रदर्शनात नवनवीन उत्पादने सादर करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. हीच परंपरा सॅमसंगने कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी एकूण सात इव्हेंटस् आखले असून, यापूर्वीच सादर केलेला गॅलेक्सी नोटची घोषणाही गेल्या आयएफए प्रदर्शनात करण्यात आली होती.

नवीन गॅलेक्सी नोट-२ ची उंची साडेपाच इंच असेल आणि जाडी अत्यंत कमी असेल. कंपनीने स्वत:चाच क्वाड कोअर प्रोसेसर विकसित केला असून, या फॅब्लेटची मेमरी २ जीबी असेल. नोट-२ हा जेली बीन प्रणालीवर आधारित असेल, असे या दैनिकाने म्हटले आहे.

मूळ गॅलेक्सी नोटला अनपेक्षितपणे ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत सोयीचा स्मार्टफोन असल्याने आतापर्यंत ५० लाखांहून अधिक विक्री झाली आहे.

Leave a Comment