मुंबई हल्ल्याबाबत पाक न्यायालयीन समितीच्या अहवालाचा बार फुसकाच!

इस्लामाबाद, दि. १८ – मोठा गाजावाजा करून २६-११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी भारतात रवाना करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीचा बार पाक न्यायालयानेच फुसका ठरविला आहे. या समितीचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायालयीन समितीने मुंबईला भेट देऊन या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबचे वकील, सरकारी वकील, तपास अधिकारी आणि न्यायाधीशांचे जबाब या समितीने घेतले होते. मात्र त्यांची उलट तपासणी घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली नाही. याच मुद्द्यावर रावलपिंडी येथील दहशतवाद विरोधी न्यायालयात लष्कर ए तैय्यबाचा कमांडर झकीर उर रेहेमान लखवी याचे वकील ख्वाजा हरीस अहमद यांनी समितीचा अहवाल पुरावा म्हणून स्वीकारण्यास आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे ग्राह्य मानून न्यायाधीश चौधरी हबीब उर रेहेमान यांनी समितीचा अहवाल या खटल्यात पुरावा मानता येणार नाही; असा निर्वाळा दिला.

मुंबीवरील हल्ल्याबाबत पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात झकीर उर रेहेमान लखवी याच्यासह सात जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.