Skip links

आहार आणि पोषणद्रव्य तज्ज्ञ

अलीकडच्या काळामध्ये बदलत्या जीवन पद्धतीनुसार वेगाने विकसित झालेले सर्वात चांगले करिअर कोणते असा प्रश्‍न केला, तर आहार तज्ज्ञ या करिअरचा उल्लेख करावा लागतो. कारण लोक आपल्या प्रकृतीविषयी खूपच जागरूक व्हायला लागले आहेत आणि आपली प्रकृती  आपल्या आहारावर अवलंबून आहे याची जाणीव त्यांच्यात वेगाने वाढायला लागली आहे.

मात्र, आपल्या आरोग्यासाठी आपण काय खाल्ले पाहिजे, याची शास्त्रीय माहिती प्रत्येकालच असते असे नाही. म्हणूनच या क्षेत्रातील तज्ज्ञांचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. बरेच पुढारी, मोठ्या उद्योग समुहातील अधिकारी, एवढेच नव्हे तर चित्रपट अभिनेते, खेळाडू या सर्वांमध्ये आपला एक आहार तज्ज्ञ असला पाहिजे, अशी जाणीव वाढत आहे. आपल्या यशामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये आपल्या डाएटिशियनने दिलेला सल्ला हे एक महत्वाचे कारण असणार आहे, याची जाणीव त्यांना झालेली आहे. म्हणून डाएटिशियन हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. विविध शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांमध्ये राहणार्‍या मुलांना कोणता आहार द्यावा, याचा निर्णय घेण्यासाठी खास न्यूट्रिशन क्षेत्रातील तज्ज्ञ नेमलेले असतात. त्यामुळे एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.

न्यूट्रिशनचे स्वतंत्र अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांमध्ये आहेतच. पण काही विज्ञान विषयक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षांना या विषयात स्पेशलायझेशन करण्याची सोय करण्यात आलेली आहे. एस.एन. डी.टी. विद्यापीठातील गृहशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर पदव्युत्तर पदवी घेताना असे स्पेशलायझेन करता येते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या अनेक मुली या व्यवसायात स्थिरावलेल्या आहेत. त्याशिवाय सरकारने सुद्धा अशा पदवीधरांसाठी काही नोकर्‍या निर्माण केलेल्या आहेत. हा विषय फार व्यापक आहे. कारण तो प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. आपल्या समाजातल्या प्रत्येकालाच खायला लागते आणि आपल्या खाण्याचा आपल्या जीवनावर काही विशिष्ट परिणाम असतो याची जाणीव सर्वांनाच असते.

खालील संस्था या विषयाचे शिक्षण देतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद, µwww.nininindia.org युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, चेन्नई, www.unom.ac.in तामिळनाडू डॉक्टर एम.जी.आर. मेडिकल युनिव्हर्सिटी, चेन्नई scripts. tnmgrmu.ac.in युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चरल सायन्सेस बंगलोर, www.uasbangalore.edu.in सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर www.cftri.com अविनाशी लिंगम इन्स्टिट्यूट ऑफ होम सायन्स ऍन्ड हायर एज्युकेशन फॉर विमेन, मेटुपलायम रोड, कोईमतूर www.avinuty.ac.in इच्छुकांनी  वरील संकेत स्थळावर संपर्क साधावा.