लक्ष्मीरोडवर रात्री ऐंशी लाखाचा दरोडा

पुणे, दि. १४ – सराफांना आणि त्यांच्या कामगाराला रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून चार ते पाच दरोडेखोरांनी त्यांच्याकडील तब्बल अडीच किलो सोन्यासह पाच किलो चांदी तसेच सव्वा लाख रूपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लुटून नेला. भर वर्दळीच्या समजल्या जाणार्‍या लक्ष्मी रस्त्यावरील `पद्म ज्वेलर्स’ या सराफी पेढीत ही थरारक घटना घडली. त्यानंतर सराफांसह त्यांच्या कामगाराला डांबून हे दरोडेखोर पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

या घटनेमुळे, शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या थरारक घटनेमुळे नव्यानेच पोलिस आयुक्तपदी रूजू झालेल्या गुलाबराव पौळ यांच्या समोर शहरातील गुन्हेगारीचे आव्हान निर्माण झाले आहे.

पद्मराज पोरवाल आणि राजेश पोरवाल असे या सराफांचे नाव आहे. मात्र, त्याच्या कामगाराचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पोरवाल बंधुचे ८५८, बुधवार पेठ येथे पहिल्या मजल्यावर सोन्या चांदीच्या होलसेल व्यवसायाचे दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री पावणे आठच्या सुमारास ही थरारक घटना घडली. चार ते पाच जणांची टोळी असलेल्या दरोडेखोरांपैकी तीन जंणांनी दुकानात प्रवेश करून तेंथे असलेल्या पोरवाल बंधूना आणि त्यांच्या कामगाराला रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून धमकावले त्यावेळी एकजण दारात उभा राहिला होता. दुकानात शिरलेल्या तिघांनी त्यांना दोरीने व लाल कापडाने बांधून त्यांचे तोंड चिकटपट्टीने चिकटवले. त्यांच्या दुकानाच्या लॉकर मधील अडीच किलो सोने, पाच किलो चांदीच्या विटा आणि गल्ल्यातील रोख सवा लाख रूपयांची रोकड घेऊन पोबारा केला. दरोडेखोर पळून गेल्यानंतर त्यांच्यातील एकाने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली आणि संबधित घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

सदरील थरारक घटना अवध्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घडली. आश्‍चर्याची बाब म्हणजे सायंकाळी सात वाजल्यानंतर या वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने नाकेबंदी करण्यात येते. पोलिसांची पेट्रोलिंगही सुरू असते. एवढी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असतानाही दरोडेखोरांनी हे धाडस केले आणि यशस्वीपणे पलायन केले, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलिस आयुक्त डॉ. संजिवकुमार सिंघल, अप्पर पोलिस आयुक्त अनंत शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ १ चे पोलिस उपयुक्त मकरंद रानडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Leave a Comment