राज्यकर्त्यांकडून न्यायव्यवस्थेचे खच्चीकरण – बार कौन्सिलच्या अध्यक्षांचा आरोप

पुणे, दि. १४ –  राज्यकर्त्यांना लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेबद्दल जराही आस्था नसून राज्यकर्त्यांकडून न्यायव्यवस्थेच्या खच्ची कारणाचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष एड. मननकुमार मिश्रा यांनी केला. न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप करणार्या विधेयकांना विरोध करण्यासाठी प्रसंगी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी वकील वर्गाची भूमिका आणि जबाबदारी’ या विषयावरील राज्यस्तरीय एकदिवसीय परिषदेसाठी एड. मिश्रा पुण्यात आले होते. या परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

न्यायाधीशांच्या नियुक्तीत राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप, उच्च शिक्षण आणि संशोधन विधेयकानुसार विधी विभागातील शिक्षणाबाबत बार कौन्सिलची स्वायत्तता दूर करून त्यांच्या अभ्यासक्रम निश्चितीच्या अधिकाराचा अधिक्षेप; अशी उदाहरणे देऊन एड. मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेतील राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले. मात्र, बार कौन्सिल राजकारण्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही; असा इशारा देऊन ते पुढे म्हणाले की, या हस्तक्षेपाला विरोध करण्यासाठी बार कौन्सिलने या महिन्याच्या ११ आणि १२ तारखेला बंद पुकारला होता. या बंदला वकील वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढे सरकारची उदासीनता कायम राहिल्यास पावसाळी अधिवेशनात कौन्सिलच्या वतीने जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत तर बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्याच्या काळात न्यायव्यवस्थेला गतिमान कारणे या केवळ गप्पा राहिल्या आहेत, अशी परखड टीका करून मिश्रा म्हणाले की; शासन न्यायव्यवस्थेबाबत पूर्ण उदासीन असून, तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व ठिकाणी न्यायाधीशांपासून कर्मचार्यांपर्यंत ३५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे वर्षानुवर्ष भरली जात नाहीत. न्यायालायाना पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत. काही राज्यातील न्यायालयात तर दैनंदिन कामकाजासाठी कागदासारखी वस्तूही उपलब्ध नाही. हे सर्व वकील स्वत:च्या खिशातून खर्च करून आणतात अथवा पक्षकारांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत न्यायव्यवस्था वेगवान, किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण करण्याची अपेक्षा कशाच्या जीवावर बाळगायची; असा सवालही एड. मिश्रा यांनी केला.

Leave a Comment