जूहू विमानतळाचा रनवे अरबी समुद्रात वाढविणार

मुंबई दि.१६- आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकच विमानतळ असल्याने मुंबई विमानतळावर होत असलेली गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जुहूचा विमानतळ लहान विमानांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विमानवाहतूक मंत्रालयाने घेतला असल्याचे वृत्त आहे. मात्र या विमानतळावरची सध्याची ११४३ मीटरची धावपट्टी त्यासाठी वाढवावी लागणार असून ही धावपट्टी अरबी समुद्रावर वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. नवी धावपट्टी २०२० मीटर असेल.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अजितसिंग यांनी महिन्यापूर्वीच या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अरबी समुद्रात हवाई पाहणी केली होती असे समजते. जूहू-तारा रोडवर अरबी सम्रुद्रात पश्चिमेकडे स्टील्टवर हा रनवे वाढविला जाणार आहे. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या किमान १०० फ्लाईट जूहू विमानतळावर उतरविता येणार आहेत. या प्रकल्पासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच आहे. या टास्क फोर्समध्ये नागरी विमान वाहतून विभागातील सह सचिव दर्जाचा एक अधिकारीही नियुक्त करण्यात आला असून आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी तो मदत करणार आहे. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर वेगाने हे बांधकाम करण्यात येणार आहे.

हे बांधकाम करताना या भागातील अतिक्रमणे हटविणे हे महत्वाचे व अवघड काम असून या भागात ३ हजार अनधिकृत झोपड्या आहेत. मात्र मुंबइ विमानतळावरील वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या दिल्लीहून मुंबई फेर्‍या सुरू झाल्या असून नियोजन समिती सदस्यांची तीन दिवसांची भेटही नुकतीच पार पडली आहे. म्हणजेच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचे हे लक्षण आहे.

Leave a Comment