काश्मीरमध्ये बाबा हनीफ दर्ग्याला आग- वातावरणात तणाव

दि.१७- मध्य काश्मीरमधील बाबा हनीफउद्दीन दर्ग्याला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हा दर्गा पूर्ण जळून गेल्याने वातावरण तणावाचे बनले आहे. बडगांव जिल्ह्यात हा दर्गा असून सुफी परंपरा असणार्‍या कारवान ई इस्लामी या संघटनेने या प्रकाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. या आगीची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे असे सांगण्यात आले.

दर्ग्याला आग लागण्याची काश्मीरातील ही महिनाभरातील तिसरी वेळ आहे. जून २५ ला २४५ वर्षे जुन्या पीर दस्तगीर दर्ग्याला अशीच आग लागली होती तर जून २९ ला आलम शरीफ दर्ग्यात तोडफोड करून कांही गुंडांनी पवित्र कुराणाची नासधूस केली होती. श्रीनगर जवळच हा नव्याने आग लागलेला दर्गा आहे. हा दर्गा २००२ सालात जळला होता व त्यानंतर तो पुन्हा बांधण्यात आला होता. या आगीच्या घटनांमागे कांही कटकारस्थान असावे अशी शंका मौलाना गुलाम रसूल हमी यांनी केली असून कृषी मंत्री गुलाम हसन मीर यांनी जनतेने शांतता पाळावी असे आवाहन केले आहे. आगीमुळे आपल्याला दुःख झाले आहे तसाच धक्काही बसला आहे असे सांगून मीर म्हणाले की या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करण्यात येईल मात्र जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये.

Leave a Comment