उद्धव ठाकरेंवर अँजिओग्राफी

मुंबई, दि. १६ – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून   त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आली असल्याचे समजते.उद्धव यांच्या छातीत दुखु लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले  असे काही जवळच्या सुत्रांनी सांगितले. प्राथमिक तपासणी करण्यात आल्या. त्यानंतर सविस्तर चाचणी सुरु आहे. त्या पूर्ण झाल्यानंतरच निदान करण्यात येईल.

उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर गोळा झाले. शिवसेनेचे नेतेही उद्धव यांच्या भेटीसाठी लिलावतीमध्ये दाखल झाले आहेत. निलम गो-हे, दिवाकर रावते यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली. याशिवाय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रामदास कदम, आमदार अनिल देसाई, रिपाईंचे रामदास आठवले इत्यादी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या अलिबाग दौर्‍यावर जाणार होते. पक्षाच्या बैठकीसाठी हा दौरा होता. परंतु, उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला असून ते उद्धव यांच्या भेटीला जाणार आहेत. वडखळ नाक्यावरुन राज ठाकरे परतले असे समजते.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये एकदाच भेट झाली आहे. यापुर्वी २००८ मध्ये ते बाळासाहेबांची पुस्तके परत करण्यासाठी ’मातोश्री’वर गेले होते. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे.

Leave a Comment