आजारी ‘दादू’च्या भेटीला राज धावला

मुंबई, दि. १७ – राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी चूल मांडल्यानंतर राजकारणाच्या मैदानावर एकमेकांवर तुटून पडणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू राजकारणातील वैर दूर ठेऊन तब्बल साडेतीन वर्षानंतर एकमेकांना भेटले. निमित्त झाले ते उद्धव यांच्या एण्जिओग्राफीचे!

सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुगालयात दाखल करण्यात आले. त्यांची एण्जिओग्राफी करून संध्याकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

उद्धव यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच हजारो शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. ही बातमी समजताच अलिबागला पक्षाच्या बैठकेसाठी निघालेले राज ठाकरे हे अर्ध्या वाटेवरून मागे फिरले आणि तडक रुग्णालयात येऊन त्यांनी उद्धव यांची भेट घेतली. उद्धव यांना घरी नेत असताना  राज ठाकरेंनी स्वतः  कार  ड्रायव्हिंग केले.

सात वर्षापूर्वी राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर सन २००८ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुस्तके परत करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीचा समाचार घेण्यासाठी ‘मातोश्री’वर त्यांची भेट घेतली. त्यानंतर आजच या दोघा भावांची भेट झाली.

राजकारणातील वैर प्राणपणाने जपतानाच `रक्ताचे नाते’ या दोघा कलावंत भावांनी कोमेजू दिलेले नाही, हेच या भेटीतून दिसून येत आहे.
 

Leave a Comment