अमरनाथ यात्रेकरू मृत्यूंची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

नवी दिल्ली दि.१६ – जम्मू-काश्मिरात अमरनाथ यात्रेस जाणार्‍या ६७ यात्रेकरूंचा यात्रेच्या काळात झालेल्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारबरोबरच केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण तसेच वन मंत्रालय, राज्य सरकार व अमरनाथ देवस्थान मंडळास नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिशीला सात दिवसांत उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

शुक्रवारच्या वृत्तपत्रात अमरनाथ यात्रेकरूंच्या मृत्यूचे वृत्त वाचून न्यायालयाने ही नोटीस पाठविली. न्या. बी. एस. चौहान व न्या. स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, यात्रेकरुंना घटनेने देशात कोठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची काय व्यवस्था केली आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

गेल्या वर्षी १०७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. याची दखल घेऊन न्यायालयाने म्हटले की, गेल्या वर्षीचा मृतांचा आकडा लक्षात घेऊन सरकारने या वर्षी यात्रेकरूंच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही उपाय योजले नाहीत.

Leave a Comment