अखेर जसवंत सिंग एनडीएचे उमेदवार

नवी दिल्ली, दि.१६ – देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ही घोषणा केली.

उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी आज सकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी ही निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा होती. परंतु, ते इच्छुक नव्हते, असे अडवाणी यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार्‍या जनता दल(संयुक्त) आणि शिवसेनेने उपराष्ट्रपतिपदासाठी मात्र एनडीएत राहण्याचा निर्णय घेतला. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजप नेते जसवंत सिंग आणि राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, अखेर जसवंत सिंग यांना उमेदवारी देण्यात आली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जेडीयूने संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हमीद अन्सारींना पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे. कम्युनिस्ट भारतीय पक्ष (एम) यांनी हमीद अन्सारींना मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हमीद अन्सारींना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि यूपीएतील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत आहे.

Leave a Comment