इजिप्त भेटीत हिलरी यांच्यावर टोमॅटो चपलांचा वर्षाव

अलेक्झांड्रीया दि.१६- इस्लामिस्ट अध्यक्ष मोहमद मुर्शी सत्तेवर आल्यानंतर प्रथमच इजिप्त भेटीवर आलेल्या अमेरिकेच्या मिनिस्टर ऑफ स्टेट हिलरी किलंटन यांच्या मोटारीवर निदर्शकांनी टोमॅटो, बूट चपला आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या असल्याचे वृत्त आहे. रविवारी हिलरी येथे आल्या तेव्हा तेथे जमलेल्या निदर्शकांनी तुम्ही परत जा अशा घोषणा दिल्या. निदर्शकांनी फेकलेल्या टोमॅटोचा प्रसाद इजिप्शियन अधिकार्‍यांनाही मिळाला. पोर्ट सिटी अलेक्झांड्रीया येथे ही घटना घडली.

याविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीप्रमाणे हिलरी यांनी येथे लोकशाही हक्काबाबत भाषण केले व त्या परत निघाल्या तेव्हा क्लिंटन यांच्या वाहनांवर निदर्शकांनी वरील वस्तूंचा वर्षाव केला. निदर्शकांनी हिलरी यांचे पती बिल सत्तेवर असताना व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या त्यांच्या मोनिका अफेअरवरून मोनिका मोनिका अशाही घोषणा दिल्या. हे निदर्शन नक्की कोणत्या पक्षाचे होते हे समजू शकले नाही कारण होन्सी मुबारक यांच्या सत्ताकाळात इजिप्तमध्ये निदर्शने ही नित्याची बाब बनली आहे.

होस्नी मुबारक यांचे अमेरिकेशी असलेले संबंध आणि मुस्लीम ब्रदरहूडला अमेरिकेकडून मिळत असलेले पाठबळ यामुळे इजिप्तमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने निवडून आलेल्या मोहमद मुर्शी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे सातत्याने सुरू असलेले प्रयत्न यामुळे इजिप्तमधील सामान्य जनता रागावली आहे. परिणामी हिलरी उतरलेल्या कैरोतील पंचतारांकित हॉटेलबाहेरही निदर्शनांकी शनिवारी रात्री निदर्शने केली होती. अलेक्झांड्रीया येथे नव्याने सुरू केलेल्या दूतावासाच्या उद्घाटनासाठी हिलरी आल्या होत्या.

हिलरी यांनी आपल्या भाषणात अमेरिका लोकशाही तत्वावर उभी असल्याचे आणि इजिप्तमधील निवडणूकांशी त्यांचा कांहीही संबंध नसल्याचे सांगितले असून त्यापूर्वी त्यांनी नव्याने निवडून आलेले मोहमद मुर्शी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या इजिप्तमधील जनरल फिल्ड मार्शल हुसेन ततान्वी यांनाही भेटल्या होत्या. अमेरिका दरवर्षी १.३ बिलीयन डॉलर्सची मदत लष्करी सहाय्यासाठी इजिप्तला करत असल्याने लोकशाही हवी असलेल्या नागरिकांचा अमेरिकेला विरोध होत आहे व परिणामी अमेरिकेबरोबर इजिप्तचे संबंध तणावाचे बनत आहेत असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment