अभिनय आणि दिग्दर्शनातील करिअर

चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री व्हावे असे न वाटणारा तरुण किंवा तरुणी शोधूनच काढावे लागतील. मात्र हे स्वप्न घेऊन प्रत्येकच तरुण-तरुणी जगत असले, तरी त्यातल्या फारच कमी लोकांचे हे स्वप्न पुरे होत असते. खरे म्हणजे चित्रपटाशी संबंधित असे अनेक करिअर्स आहेत. केवळ अभिनय हे काही एकमेव करिअर नाही.

चित्रपटाचा दिग्दर्शक, सहदिग्दर्शक, कॅमेरामन, नृत्य दिग्दर्शक, कथालेखक, पटकथा लेखक, मिक्सर, प्रोसेसिंग करणारे कलाकार, एडिटर्स, पब्लीक रिलेशन्स, प्रसिद्धी प्रमुख, चित्रकार अशा कितीतरी करिअर पर्याय चित्रपट सृष्टीमध्ये उपलब्ध आहेत. पण सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त हिरो आणि हिरॉईन हेच झळकत असल्यामुळे केवळ याच दोन करिअरविषयी मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये प्रचंड आकर्षण असते. चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या अनेक कलाकारांचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, त्यातले बरेच कलाकार योगा योगाने आणि अपघाताने या क्षेत्रात आलेले असतात. त्यातल्या ज्या कलाकारांच्या अंगात मुळातच ती कला असते ते निरीक्षणाने आणि अनुभवाने पुढे सरकतात आणि नाव कमावतात. यातले फारच कमी कलाकार प्रशिक्षण घेऊन आलेले असतात.

देवानंद, राजकपूर, दिलीप कुमार हे मोठे कलाकार होऊन गेले, पण त्यांनी काही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेले नव्हते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये चित्रपटातच करिअर करायचे हा हेतू मनात ठेवून प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात येणार्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागात अनेक तरुण मुले-मुली अभिनयामध्ये खूपच वाकबगार असतात. मात्र त्यांना प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ते कायम मागे पडतात. आता अशा ग्रामीण भागात सुद्धा अशा मुलांना प्रशिक्षण देऊन पुढे आणले पाहिजे आणि गरज पडल्यास अशा प्रशिक्षणावर खर्चही केला पाहिजे याची जाणीव वाढायला लागली आहे. मात्र असे प्रशिक्षण देणार्‍या संस्था कुठे आहेत याची माहिती नसते आणि सार्‍या गोष्टी अनुकूल असून सुद्धा हे कलाकार कोठे तरी कारकुनी काम करीत जीवन व्यतित करीत राहतात.

पुण्यामध्ये फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही संस्था या क्षेत्रातली पदव्युत्तर पदवी देत असते. तिच्याशी संपर्क साधता येईल. तिचे संकेतस्थळ www.ftiindia.com असे आहे. हैदराबाद येथे सुद्धा फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ आंध्र प्रदेश या संस्थेत बारावीनंतरचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्याशिवाय कोलकत्ता येथे सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये पदवीनंतरचा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम आहे. त्या पदविका अभ्यासक्रमात तिसर्‍या वर्षी आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन सुद्धा करता येते. या संस्थेचे संकेतस्थळ srfti.gov.in असे आहे.