संसदेसाठी लवकरच नवीन इमारत

नवी दिल्ली दि.१४ – सध्याच्या संसद भवनाची वास्तू ८५ वर्षांची पुरातन असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ही वास्तू फार सुरक्षित नसल्याने लवकरच संसदेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांनी पर्यायी संकुलासाठी योग्य त्या सूचना करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यास मान्यता दिल्याने लवकरच नवी वास्तू साकारली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभेचे सरचिटणीस टी. के. विश्वनाथन म्हणाले की, नवीन संसद भवन बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करणे, येणारा खर्च, नवीन वास्तू कशी असावी आदि मुद्द्यावर सूचना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यास लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.  नवीन संसद भवन बांधण्याची आवश्यकता असून सध्याच्या वास्तूचा भरपूर वापर झाला असून अधिक ताण सहन करण्याची क्षमता आता या वास्तूत नाही.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे की, संसद भवनाच्या नूतनीकरणाची नितांत आवश्यकता आहे.

विश्वनाथन म्हणाले की, येत्या काही दिवसांतच उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली जाईल. या समितीत नगर विकास मंत्रालयास प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे.मुंबईत मंत्रालयास लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सभापती मीरा कुमार यांनी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याचे आदेश सचिवालयास दिले आहेत. भविष्यकाळात संसद सदस्यांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन नवीन वास्तूची उभारणी केली जाईल.

सध्याच्या संसद भवनाची पायाभरणी १९२१ करण्यात आलेली होती व जानेवारी १९२७ मध्ये संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या वेळी ही वास्तू बांधण्यास ८३ लाख रुपये खर्च आला होता.

Leave a Comment