विकिपिडीया ज्ञानकोश दहा वर्षांचा झाला

वॉशिंग्टन दि.१४- सर्वसामान्यांपासून अति हुषार अशा सर्व जनतेच्या ज्ञानात भर घालणार्‍या विकीपिडीया ला अस्तित्त्वात येऊन दहा वर्षे झाली असली तरी आजही जगात सर्वाधिक पाहिल्या जाणार्‍या १० वेबसाईटमध्ये तिचे स्थान अबाधित राहिले आहे. फेसबुक आणि ट्टिटर सारख्या युजर फ्रेंडली साईटच्या स्पर्धेतही विकिपिडीया आजही त्याचे स्थान टिकविण्यात यशस्वी ठरली आहे.

वॉशिंग्टन येथे गेल्याच आठवड्यात विकिपिडीयाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विकीमॅनिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अक्षरशः हजारो लोक उपस्थित होते. २००१ पासून सुरू असलेल्या या वेबसाईटविषयी सर्वच सदस्य मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त करत होते. वेबसाईटसाठी दहा वर्षे हा कालावधी मोठा आहे त्यामुळे आता या साईटने बदलायला हवे, नवे स्वरूप घ्यायला हवे अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. दहा वर्षात बदल झाला नाही मात्र आता साईट अपग्रेड करायला हवी असे सदस्यांचे मत होते.

साईटचा संस्थापक जिमी वेल्स यानेही विकीपिडीयाचे बॉस आम्ही नाही तर विकिपिडीयाचे सर्व सदस्य आहेत असे सांगितले. तो म्हणाला की एक विशिष्ठ ध्येयाने आपण एकत्र आलो आहोत आणि आम्ही आपण सर्व एक कम्युनिटी आहोत हाच दृष्टीकोन ठेवला आहे. साईटमध्ये बदल करायचा का, कसा करायचा याचा विचारही आपण सर्वांनी मिळूनच करायचा आहे.

यासबा, स्वाहिली आणि आफ्रिकानसह २८५ भाषांत असलेल्या या साईटवर २२ दशलक्ष आर्टिकल्स आहेत. १ लाखांपेक्षा अधिक लोक या साईटचे कॉट्रिब्युटर आहेत. मात्र नवीन जॉईन होणार्‍यांसाठी ती अधिक सुलभ, सोपी हवी असे अनेकांचे मत आहे. या साईटवर कुणीही माहितीत भर टाकू शकतो, संपादन करू शकतो मात्र ती एकूण प्रोसेस बरीच किचकट आहे असेही मत व्यक्त केले जात आहे. असे असले तरी आपल्या चुका प्रामाणिकपणे कबूल करण्याचे धैर्य साईटने नेहमीच दाखविले असल्याने या ज्ञानकोशावरचा लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे हेही तितकेच खरे.

Leave a Comment