केळकर संग्रहालयातील प्रत्येक वस्तू प्रेरणादायक

पुणे, दि. १४ – राजा दिनकर केळकर संग्रहालयातील प्रत्येक वस्तू प्रेरणादायक आहे. तुमच्या कामातील कौशल्य दाखवा, असे  आव्हान त्या वस्तू तरुण पिढीला करत आहे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. हे संग्रहालय टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने केळकर संग्रहालयाचे संस्थापक (कै.) दि.गं. केळकर लिखित ‘लॅम्प्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन पुरंदरे आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी पुरंदरे बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार सुधाकर खासगीवाले, संग्रहालयाचे संचालक आणि दि. गं. केळकर यांचे नातू सुधन्वा रानडे, केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशक इरा जोशी आणि संचालक राजेश झा, रेखा रानडे आदी यावेळी उपस्थित होते.

पुरंदरे म्हणाले, संस्कृती आणि कला जपण्याची पुण्याची परंपरा आहे. मुलांमध्ये संस्कृती विषयक आवड निर्माण होण्यासाठी शालेय जीवनात प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पाश्‍चिमात्य देशांच्या धर्तीवर विविध संग्रहालये, ऐतिहासिक वस्तू दाखवून त्यांच्याबद्दल आवड निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय तरुण पिढीतूनही नवीन चित्रकार, शिल्पकार घडणार नाहीत.

केळकर संग्रहालयात सौंदर्याचा अद्भूत खजिना आहे. एकट्या काकासाहेब केळकर यांनी आतोनात प्रयत्नातून हे संग्रहालय उभे केले आहे. हे जतन करून त्याची किंमत वाढवली पाहिजे. केवळ देशातच नव्हे, तर जगभर या संग्रहालयाचे महत्त्व वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले.  
संग्रहालयाचे नवीन जागेत स्थलांतर लवकर व्हावे

मी सध्या ९२ वर्षांचा असून, माझे वय जास्त नाही. शासनाने केळकर संग्रहालयाला जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत संग्रहालयाचे स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.

Leave a Comment