एलजी ने केला ३८० दशलक्ष डॉलर्सला समझोता

सॅन फ्रन्सिस्को दि.१३- मार्केटमध्ये अन्य कंपन्यांच्या सहाय्याने एलसीडी स्क्रीनच्या प्राईस फिक्सिंग प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात दक्षिण कोरियाच्या बलाढ्य एलजी इलेक्ट्रोनिक्स कंपनीने ३८० दशलक्ष डॉलर्सचा समझोता केला असून अशाच प्रकारच्या समझोता केलेल्या अन्य दहा कंपन्यांच्या तुलनेत ही सर्वाधिक रक्कम आहे.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार १९९० पासूनच एलसीडी स्क्रीन बनविणार्‍या कंपन्यांनी आपापसात प्राईस फिक्सिंग केले असल्याचा व त्यामुळे ग्राहकांना एलसीडी टिव्ही, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रोनिक्स वस्तू जादा किंमत देऊन खरेदी कराव्या लागत असल्याचे म्हटले गेले आहे. या याचिकेनुसार अनेक कंपन्यांना यापूर्वीच दोषी ठरविण्यात आले असून त्यांनी दंडही भरला आहे. या कंपन्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकीलाने एलजी, एव्ही औपट्रोनिक्स व तोशिबा या तीन कंपन्यांनी केलेली सेटलमेंट उघड केली असून एव्ही औपट्रोनिक्स ने १७० दशलक्ष तर तोशिबाने २१ दशलक्ष डॉलर्सची सेटलमेंट केली आहे. अर्थात तोशिबाच्या प्रवक्त्याने कंपनीने कोणतेही गैरकृत्य केले नसून पुढील खर्च टाळण्यासाठी ही सेटलमेंट केल्याचे निवेदन दिले आहे. एलजीने मात्र अद्यापी कोणतेही समर्थन दिलेले नाही. अन्य सात कंपन्यातील सॅमसंग, शार्प, हिताची या तीन कंपन्यांनी यापूर्वीच दंड भरला आहे. नवीन डील अंतिम मानले गेले तर ही समझोत्याची रक्कम १ बिलीयन डॉलर्सवर जाईल असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment