आक्रस्ताळी अभिनिवेश

कर्नाटक सरकारने बेळगावची महानगरपालिका अखेर बरखास्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधान-सभेत काल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बेळगावमधल्या मराठी भाषकांचे तिथल्या सरकारशी गेल्या ५० वर्षांपासून जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये सारे मराठी बांधव आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे, अशी ग्वाही महाराष्ट्राच्या विधानसभेत देण्यात आली. बेळगावच्या मराठी भाषकांना महाराष्ट्रात यायचे आहे. कर्नाटक सरकारला ते मान्य नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला, त्यावर महाजन आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाने बेळगाव हे कर्नाटकातच असले पाहिजे असा निवाडा दिला. बेळगावकरांना हा निवाडा मान्य नाही. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रात येण्याची धडपड जारीच आहे आणि महाराष्ट्र सरकारलाही हा निवाडा मान्य नाही. मात्र, या सगळ्या गोष्टींना आता ४० वर्षे उलटून गेलेली आहेत. वास्तविक पाहता वादग्रस्त सीमाभाग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. त्या भागामध्ये बेळगाव, कारवार, धारवाड, बीदर, भालकी, संतपूर अशा मोठ्या प्रदेशाचा समावेश होता आणि प्रदीर्घ काळ या सर्व तालुक्यांसह सीमा भाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, अशी मागणी केली जात होती.

याच काळामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हे दोन सोलापूर जिल्ह्यातले तालुकेसुद्धा वादग्रस्त होते. हे तालुके महाराष्ट्रात असले तरी तिथे कन्नड बोलणार्‍यांची संख्या जास्त आहे. अजून सुद्धा तिथल्या बर्‍याच मोठ्या जनसमुहाची व्यवहारातली बोलीभाषा कन्नडच आहे. परंतु तरी सुद्धा हे दोन तालुके महाराष्ट्रात राहिलेली आहेत आणि तिथल्या लोकांची आता कसलीही तक्रार नाही, ते महाराष्ट्रात सुखी आहेत. बेळगावसह जो वादग्रस्त सीमाभाग मानला जातो त्यातल्याही बेळगाव वगळता बाकी सगळ्या गावातील आणि तालुक्यातील लोकांनी कर्नाटकात राहणे पसंत केले आहे. धारवाड, कारवार, बीदर, भालकी, संतपूर अशा कोणत्याही गावातून आता महाराष्ट्रात जाण्याविषयीची मागणी चुकून सुद्धा केली जात नाही. फक्त बेळगावचा लढा जारी आहे. मात्र हा प्रश्‍न ज्या काळात निर्माण झाला, त्यानंतर राजकारण्यांच्या दोन पिढ्या तरी मागे पडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना आणि अन्यही राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेळगावच्या लोकांचे दु:ख आणि वेदना म्हणाव्या तशा तीव्रपणे जाणवत नाही. त्यामुळे बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे कधीच होत नाही.

असे असले तरी आपण मराठी भाषक आहोत आणि आपल्या शेजारच्या राज्यातील मराठी भाषक काहीतरी मागणी करत आहेत, तेव्हा मराठी भाषक म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना अधूनमधून वाटते आणि बेळगाव महानगरपालिकेच्या बरखास्तीसारखा विषय समोर आला की, उबळ आल्यासारखे महाराष्ट्रातले विधानसभेतले सर्व सदस्य मोठ्या अहमहमिकेने कर्नाटक सरकारचा निषेध करायला बाह्या सरसवायला लागतात. महाराष्ट्रात या सीमा भागातील लोकांविषयी सहानुभूती असणारे काही लोक असतातच आणि त्यांच्या मतांसाठी अधूनमधून हा गोंधळ घालावा लागतो, हे आता महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना माहीत झालेले आहे. आता कर्नाटक सरकारने बेळगावची महानगरपालिका बरखास्त केली आहे. ते निमित्त करून महाराष्ट्र विधानसभेने सीमाभागातील लोकांच्या मागे उभे असल्याचा देखावा करण्याचा उपचार काल पार पाडला. मात्र हे करत असताना बेळगावची महानगरपालिका, जी मराठी भाषकांच्या ताब्यात आहे, कर्नाटक सरकारने का बरखास्त केली? यामागच्या कारणांची मीमांसा कोणी केलेली नाही. या महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाने कर्नाटकाचा स्थापना दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले, हे योग्य आहे का? याचा परखडपणे विचार केला पाहिजे.

महाराष्ट्रात परराज्यातून येऊन राहिलेले अनेक लोक आहेत. परंतु त्यापैकी कोणीतरी एक मे हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले असते, तर आपल्याला काय वाटले असते? मग कर्नाटक सरकारला त्यामुळे वाईट वाटले असेल तर त्यात त्या सरकारची काय चूक आहे? मात्र, असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस महाराष्ट्रामध्ये फक्त राज ठाकरे यांनी केलेले आहे. बाकी सारे नेते जमेल तेवढ्या आक्रस्ताळेपणाने कर्नाटक सरकारच्या निषेधामध्ये सहभागी झालेले आहेत. कर्नाटकात आता भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे काही नेत्यांना तर ही भाजपाला अडचणीत आणण्याची एक चांगली संधी वाटली आणि त्यांनी या निमित्ताने आपला भाजपाद्वेष शमवून घेतलेला आहे आणि शेवटी सर्वांनी मिळून हा वादग्रस्त सीमाभाग कर्नाटकातून काढून केंद्रशासित करावा, अशी जगावेगळी मागणी केली आहे. या वादग्रस्त भागातले मराठी भाषक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाठवतात. तिथे आपली मराठी भाषा सोडून इंग्रजी शिकायला तयार असतात. पण आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची कन्नड भाषा अजिबात शिकायचेच नाही, असा त्यांनी पण केला आहे. इंग्रजी भाषेविषयी प्रेम पण कन्नड भाषेविषयी द्वेष हा काय प्रकार आहे? कोणी विचार करील का? हा प्रश्‍न अनेकांना आवडणारही नाही, पण तो कोणी तरी विचारलाच पाहिजे.