मनुष्यबळ विकास अभ्यासक्रम

वीस वर्षांपूर्वी आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास नावाचे काही शास्त्र असते याची जाणीव हळूहळू वाढायला लागली. केंद्रामध्ये सुद्धा शिक्षण मंत्रालयाचे नामकरण मनुष्य बळ विकास मंत्रालय असे करून मनुष्यबळ विकासाचे महत्व वाढवले गेले. मात्र उद्योगांमध्ये खास या शास्त्राचा अभ्यास करून पदवी घेतलेले पदवीधर काही मिळू शकले नाहीत. कारण याच विशिष्ट शास्त्राचा अभ्यासक्रम पुरता विकसित झालेला नव्हता. त्यामुळे अर्धवट शिक्षण आणि अनुभव यांच्या जोरावर विविध कारखान्यांमध्ये लेबर ऑफिसर, पर्सोनल ऑफिसर अशा पदांवर काम करणार्‍या लोकांनाच मनुष्यबळ विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली. अनुभवाच्या जोरावर त्यांनी अशी कामे रेटली खरी, परंतु शिक्षणाचा अभाव त्यांना नडत गेला. आता यातल्या बर्‍याच लोकांना मनुष्यबळ विकास किंवा एच.आर.डी.चे शिक्षण घेण्याची इच्छा व्हायला लागली आहे. नोकरीत अडकल्यामुळे असे लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी पत्रद्वारा प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.

कलकत्त्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) या संस्थेने असे पत्रद्वारा प्रशिक्षण देण्याचे योजिले आहे आणि विविध कारखान्यात काम करणार्‍या पर्सोनल मॅनेजर्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स ऑफिसर्स, लेबर वेल्फेअर ऑफिसर्स, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट ऑफिसर्स अशा अधिकार्‍यांना शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. या संस्थेची सुरुवात १९८० साली झाली. परंतु सुरुवातीच्या काळात फार कमी अभ्यासक्रम होते. उद्योगांची गरज वाढत गेली तस तसे या संस्थेतील अभ्यासक्रमही वाढत गेले. आज जवळपास  ५२ अभ्यासक्रम आहेत. उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश या संस्थेने केलेला आहे. या संस्थेतर्फे तीन वर्षांचे पदव्युत्तर पदविकेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.

हा सारा अभ्यासक्रम पत्रद्वारा पूर्ण करावयाचा आहे. परंतु जो नोंदणी करेल त्या प्रत्येकाला अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी मॅनेजमेंट ऍप्टीट्यूड टेस्ट ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. परीक्षेनंतर काही विशिष्ट कागदपत्रे जोडलेला अर्ज भरल्यानंतर प्रवेश दिला जातो. पत्रद्वारा अभ्यासक्रमाची एक पद्धत असते. तिच्यानुसार संस्था आपल्या घरी क्रमिक पुस्तके पाठवते, त्या पुस्तका वरून अभ्यास केला जातो आणि योग्य वेळेवर प्रश्‍नपत्रिका पाठवून त्यांची उत्तरे मिळवली जातात. एनआयपीएम या संस्थेची एक शाखा बंगलोरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तिचा पत्ता – चेअरमन, एनआयपीएम, कर्नाटक चॅप्टर नं. सी-२०९, सेकंड फ्लोअर, ब्ल्यू क्रॉस चेंबर्स, ११ इन्फट्री रोड क्रॉस, बंगलोर-१. संस्थेचा ईमेल ऍड्रेस – [email protected] असा आहे.

Leave a Comment