मुंबई दि.१३ – कृषी क्षेत्रातील बी-बियाणांची विक्री करणारी प्रमुख कंपनी असलेली ‘महिको’ वर बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याचा आरोप असून या आरोपाची खातरजमा करून महिकोचा बियाणे विक्रीचा परवाना राज्य शासन रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकारांशी बोलताना राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, महिको कंपनीविरुद्ध असलेल्या तक्रारीचे गंभीर स्वरुप पाहता त्या कंपनीचा बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. कंपनीवर बीटी कपाशीचे बियाणे विक्रीत काळाबाजार करीत असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून कंपनीती काही अधिकार्यांविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आलेली आहे. या विषयाचे विधिमंडळातही पडसाद उमटले होते, असेही ते म्हणाले.
मंत्री पुढे म्हणाले की, कंपनी बर्याच काळापासून हा गैरव्यवहार करीत असून यापुढे सरकार असे प्रकार सहन करणार नाही. महिको कंपनीचा परवाना रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय १८ जुलै रोजी घेतला जाईल. त्या वेळी कृषी आयुक्तालयात कंपनीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना कपाशीच्या बियाणांसाठी जादा पैसे घेतले जात असल्याचा मुद्दा मनसेचे आमदार तुकाराम डिकळे यानी विधानसभेत उपस्थित केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.