नृत्यात करिअर

नृत्य, नाट्य, संगीत अशा कलांचा अभ्यासक्रमाची मोठी परंपरा भारतामध्ये आहे. परंतु अशा कलाकारांना पूर्वीच्या काळी समाजात सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. या कला म्हणजे जगण्याचे साधन तर बनत नव्हत्याच, पण त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनसुद्धा हिणकसपणाचा असे. कलाकार म्हणजे वाया गेलेला माणूस, असेच मानले जात असे.

पण आजच्या काळात मात्र या कलांना प्रतिष्ठाही मिळालेली आहे, राजाश्रय आणि लोकाश्रय प्राप्त झालेला आहे आणि या कलांचा अभ्यास करणार्‍यांना त्या उपजीविकेचे साधन सुद्धा बनल्या आहेत. एवढी प्रगती झाल्यानंतर त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची सोय झाली नसेल तरच नवल.

आपल्याला नाटक आणि संगीत यांच्या अभ्यासक्रमांची सोय करणार्‍या संस्थांची चांगलीच माहिती झालेली आहे. परंतु नृत्याच्या बाबतीमध्ये म्हणावी तेवढी प्रगती झालेली नाही. केवळ नृत्याचे शिक्षण देणार्‍या संस्था अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत.

हळू हळू त्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक तरुण मुली नृत्याकडे करिअर म्हणून बघायला लागल्या आहेत. भारतामध्ये भरत नाट्यम्, ओडिसी, कथ्थक, मणिपुरी, कथकली, कोचिपुडी, मोहिनी अट्टम आणि सत्रीया असे नृत्य प्रकार आहेत. या प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नृत्याचे शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये अशा एखाद्याच प्रकाराचे शिक्षण दिले जाते.

मात्र, सगळ्याच प्रकारच्या शिक्षण देणार्‍या संस्था मात्र कमी आहेत. नृत्याचे क्लासेस अनेक ठिकाणी चालतात, पण त्या क्लासेस मध्ये शास्त्रीय पद्धतीने शिक्षण दिले जाईलच याची खात्री नसते आणि तिथल्या शिक्षणानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्रही दिले जात नाही. त्यांना ते नकोही असते. कारण क्लासेसमधले शिक्षण देणारे आणि घेणारे दोघेही हौशी असतात. आता मात्र काही संस्थांमध्ये अभ्यासक्रमाची बारकाईने विचार करून रचना करण्यात आलेली आहे आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहे.

अशा संस्था पुणे, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळूर अशा मेट्रो सिटीज मध्येच आहेत. बंगळूर येथे नाट्य इन्स्टिट्यूट ऑथ कथ्थक ऍन्ड कोरिओग्राफी ही मान्यताप्राप्त संस्था आहे. तिचा पत्ता ३७, १७ क्रॉस, मल्लेश्‍वरम् बंगळूर ५६००५५ असा असून फोन क‘. ०८०२३३४८६४५ असा आहे. ही संस्था सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका माया राव यांनी काढलेली आहे.

त्यानंतर बंगळूरमध्येच अभिनव डान्स कंपनी, नृत्य ग्राम, शांभवी स्कूल ऑफ डान्स अशा इतरही काही संस्था आहेत. स्वत: नृत्य करणार्‍या कलावंतांना असे अभ्यासक्रम तर उपयोगी पडतातच. पण सध्याच्या काळामध्ये नृत्य दिग्दर्शक हे करिअर फारच फायदेशीर व्हायला लागलेले आहे. तेव्हा नृत्य दिग्दर्शक होण्यासाठी सुद्धा या संस्थांतले अभ्यासक्रम उपयोगी पडणार आहेत.

Leave a Comment