महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात गुटखा तयार करणे, विकणे, साठवणे आणि त्याची वाहतूक करणे यावर कायद्याने बंदी राहणार आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर ही बंदी लादण्याची ही दुसरी वेळ आहे. २००३ साली असा प्रयत्न झाला होता. राज्यातल्या काही मंत्र्यांना आणि नेत्यांनाच गुटख्याची आवड निर्माण झाली होती आणि त्याचे दुष्परिणाम काही मंत्री भोगत होते. त्यामुळे चिडून जावून गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती.
मात्र, या बंदीला गुटखा लॉबीने न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे हा विषय न्यायालयात गेला. राज्य सरकारच्या काही नेत्यांच्या मनामध्ये असलेली गुटख्याविषयीची चीड योग्यच आहे. परंतु त्या चिडीपोटी त्याच्यावर बंदी घालताना कायद्याचा बारकाईने विचार करायला हवा होता. तसा तो झाला नाही. त्यामुळे त्यावर्षीची ती बंदी बेकायदा ठरली. गुटखा हे फारच विनाशकारी व्यसन आहे, परंतु आपल्या देशातला कायदा त्यावर बंदी घालण्याची परवानगी देत नाही ही एक मोठी विसंगतीच म्हणावी लागेल. शेवटी केंद्र सरकारनेच तसा कायदा केला. त्यामुळे आता घेतलेल्या गुटखा बंदीच्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकणार नाही. देशामध्ये गुटख्याच्या निर्मितीत आणि वापरात आठ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.
या व्यवसायात एवढा अर्थ असेल तर त्याच्यावर बंदी घालण्याने कोणावर तरी अनर्थ ओढवणारच असतो. मग असे लोक येनकेनप्रकारेन ही बंदी उठावी असावी, यासाठी किंवा ती लादलीच जाऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि त्यातून गुटखा लॉबी तसेच राजकीय नेते यांच्यामध्ये हातमिळवणी होऊ शकते. आता देशात मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीनच राज्यांमध्ये गुटख्यावर बंदी आहे. मध्य प्रदेश आणि बिहारचे मुख्यमंत्री सध्या फार चांगले काम करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना तत्परतेने गुटख्यावर बंदी लादावीशी वाटली. मात्र बाकीच्या राज्यांना आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना गुटख्याचे दुष्परिणाम कळले नाहीत की काय, ते कळले असणारच. परंतु तरीही त्यांनी गुटख्यावर बंदी घातलेली नाही याचाच अर्थ गुटखा लॉबी आणि राज्यकर्ते यांच्यातली मैत्री कुठे तरी काम करायला लागलेली आहे.
महाराष्ट्रात मात्र ही बंदी लागू झाली तिच्यामागे काही कारणे आहेत. सगळ्यात मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्राची फार बदनामी झालेली आहे. जागतिक तंबाखू दिनाच्या दिवशी या संदर्भात जनजागृती करण्याकरिता अनेक कार्यक्रम झाले आणि या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून समोर आलेल्या आकड्यामध्ये महाराष्ट्र हे तंबाखू खाण्यात अग्रेसर राज्य असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातले ३१ टक्के लोक तंबाखूचा या ना त्या प्रकाराने वापर करतात. एकट्या मुंबई शहरात ६० लाख लोक तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत आणि दरसाल २० लाख लोक तंबाखू किंवा गुटखा खाल्ल्याने कर्करोग होऊन मरण पावतात, असे दिसून आले. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर गुटख्याची लोकप्रियता वाढल्यापासून महाराष्ट्रात अल्पवयात कर्करोग होऊन मरण्याची साथच पसरलेली आहे.
या वस्तुस्थितीमुळे सरकार खडबडून जागे झाले. अनेक सामाजिक संघटनांचा दबाव सरकारवर आला आणि महाराष्ट्र सरकारने आता गुटखा बंदी निर्धाराने लागू केली आहे. या बंदीमुळे महाराष्ट्र शासनाचे दरसाल शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. पण शासनाने एवढे नुकसान सहन करण्याची तयारी केलेली आहे. कारण गुटख्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी तर बरबाद होत आहे. अनेकांचे अकाली निधन होऊन त्यांचे संसार उघड्यावर येत आहेत. या नुकसानीच्या मानाने दरसाल १०० कोटींचे होणारे नुकसान हे नगण्य आहे. महाराष्ट्रात आता गुटख्यावर बंदी राहणार आहे. मागेही २००३ साली अशी बंदी घातलेली होती. पण ती न्यायालयाच्या निर्देशावरून उठवावी लागली. असे असले तरी या बंदीच्या काळात महाराष्ट्रभर गुटख्याची विक्री चोरून-मारून आणि उघडपणेही सुरूच होती. गुटखा बंदी केवळ कागदावरच राहिली होती. मागच्या बंदीच्या काळामध्ये असे का झाले? ती बंदी निरर्थक का ठरली? याचा विचार व्हायला हवा. गुटख्यासारख्या व्यसनावर केवळ एका राज्यात बंदी घालून भागत नाही. शेजारच्या राज्यात सुद्धा बंदी हवी. तशी ती नसल्यामुळे महाराष्ट्रात चोरून गुटखा विक्री सुरू राहिली.
महाराष्ट्रात जिथून चोरट्या मार्गाने गुटखा येत होता त्या राज्यातल्या गुटखा तयार करणार्या कारखान्यांवर महाराष्ट्र शासनाचे कसलेच नियंत्रण नव्हते. तेव्हा असे लक्षात आले की एकाच राज्यात अशी बंदी घालून काही होत नाही. भारत सरकारने पूर्वीच्या काळी दारूवर अशी बंदी घातलेलीच होती. परंतु तिच्यामुळे दारू बंद झालीच नाही. उलट अवैध पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने दारू तयार करण्याचे उद्योग जारी राहिले आणि त्याचे उलट दुष्परिणामच जास्त व्हायला लागले. परिणामी सत्ताधारी पक्षाचे नेतेच दारूबंदीची चेष्टा करायला लागले. शेवटी सरकारने दारूबंदी उठवली. तसाच अनुभव गुटख्याच्या बाबतीत येणार आहे.