जीआयएस – विस्तारते करिअर

gis

सध्याच्या काळामध्ये वेगाने वाढत जाणारे करिअर क्षेत्र म्हणजे जीआयएस. पृथ्वीची माहिती जमा करणे, ती साठवणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि योग्य प्रकारे वापर करण्या संबंधी योजना आखणे अशा कामांसाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याला जिऑग्राफीक इन्फर्मेशन सिस्टीम्स् (जीआयएस) असे म्हणतात. याच प्रकारचे काम आणखी एका तंत्रज्ञानाने केले जाते ते म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस). सध्या या तंत्रज्ञानाचा वापर जीवनाच्या सर्व क्षेत्रात केला जात आहे. कारण पृथ्वीवरची साधन सामुग्री सर्वच क्षेत्रातल्या लोकांच्या उपयोगाला येत असते.

या तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये वर उल्लेखित केलेल्या कामांसाठी वापरल्या जाणार्‍या संगणक आज्ञावली (सॉफ्टवेअर)चे ज्ञान दिले जाते. भौगोलिक ज्ञानाशी संबंधित अशा या आज्ञावली असतात. त्यामुळे हे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये जमा झालेल्या माहितीचे शास्त्रीय विश्‍लेषण करण्याची क्षमता हवी. या विश्‍लेषणातून आपल्या पृथ्वीवर निर्माण झालेल्या विविध समस्यांची सोडवणूक सुद्धा केली जात असते. त्यामध्ये नद्या, पाणी, जमीन, माती, जंगले, पर्वत, डोंगर, समुद्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. सध्या अशा साधन सामुग्रीचा शोध घेण्यासाठी हवाई सर्वेक्षणाचा वापर केला जात असतो. त्यातून मिळणार्‍या माहितीचे व्यवस्थापन  आणि उपयोजन करण्यासाठी काही कंपन्या कार्यरत झालेल्या आहेत. अशा दीडशे जीआयएस कंपन्या एकट्या हैदराबाद शहरामध्ये आहेत. अशा कंपन्यांमध्ये चांगल्या नोकर्‍या मिळू शकतात.

जीआयएस तंत्रज्ञानाचे ज्ञान देणार्‍या संस्था हैदराबादच्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते पीएच.डी. पर्यंत पदव्या घेण्याची सोय आहे. हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये जीआयएस संबंधी अभ्यासक्रम आहेत. या संस्थेचे संकेतस्थळ www.jntu.ac.in असा आहे. त्याशिवाय नोएडा येथेही जीआयएस इन्स्टिट्यूट ही संस्था असून तेथेही जीआयएस तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अनेक विद्यापीठांमध्ये भूगोलाचे प्रगत ज्ञान देणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते ज्ञान देतानाच तेथे जीआयएस तंत्रज्ञानाचेही शिक्षण दिले जाते. कुवेंपु विद्यापीठात सुद्धा जीआयएस आणि जीपीएस तंत्रज्ञानाचे प्रगत शिक्षण दिले जाते. या संस्थेचे संकेतस्थळ www.kuvempuuniversity.org असे आहे. हा अभ्यासक्रम करू इच्छिणार्‍या तरुणांनी आपल्या परिसरातील कोणत्याही विद्यापीठाच्या भूगोल किंवा भूगर्भशास्त्र विभागाशी संपर्क साधावा. या अभ्यासक्रमाने कला शाखेच्या विद्यार्थ्यांना एक चांगली करिअर संधी उपलब्ध करून दिलेली आहे.