नवी दिल्ली दि.१३- राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अगदी तोंडावर आली असून १९ तारखेला त्यासाठी मतदान होत आहे. मतदान करणार्या मतदारांचे इलेक्टोरल कॉलेजने जे विश्लेषण केले आहे त्यानुसार खुनाचा आरोप असलेले, अपहरणाचे गुन्हे दाखल असलेले, बलात्कारी, दरोडे घातल्याचे गुन्हे दाखल असलेले मतदार या निवडणूकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडणार आहेत.
खून अपहरणाचे गुन्हे असलेले निवडणार नवीन राष्ट्रपती
लोकसभा, राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यातील आमदार मिळून राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत मतदान करत असतात.यालाच इलेक्टोरल कॉलेज असे म्हटले जाते. नॅशनल इलेक्शन वॉच ने या सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या निवडणुका लढविण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत ती तपासली असता वरील बाब उघड झाली आहे. नॅशनल इलेक्शन वॉचने ७७६ पैकी ७७२ खासदारांची तसेच ४१२० आमदारांपैकी ४०६३ आमदारांची प्रतिज्ञापत्रे तपासली आहेत.
या ४८३५ खासदार आमदारांपैकी १४४८ म्हणजे ३१ टक्के प्रतिनिधींवर गुन्हेगारी केसेस दाखल झालेल्या आहेत. पैकी ६४१ खासदार आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, दरोडे आणि खंडणी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सहा जणांवर बलात्काराचा आरोप आहे तर १४१ जणांवर खुनाचे आरोप आहेत. ३५२ जणांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, १४५ जणांवर चोरी,९० जणांवर अपहरण, ७५ जणांवर दरोडे घातल्याचे आरोप असून या सर्वांच्या मतांची संख्या आहे ३,३५,०८९.
या गुन्हेगार खासदार आमदारांत पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून १८९ जणांवर असे गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून येथे १४६ जणांवर तर बिहार मध्ये १३९ जणांवर असे गुन्हे दाखल आहेत. मतदान करणार्या मतदारांत ४८ टक्के खासदार आमदार करोडपती आहेत त्यांचा मतांचा हिस्सा ५४ टक्के इतका आहे. मतदार महिलांचे प्रमाण मात्र केवळ ९ टक्के इतकेच आहे.