उपराष्ट्रपतिपदासाठी ‘तृणमूल’ची गोपाळ गांधीना पसंती

कोलकता दि.१३ – येत्या ७ ऑगस्ट रोजी होणार्‍या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ‘यूपीए’चा कल विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा असला तरी, या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने  आपली पहिली पसंती पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांच्या नावाला असल्याचे शुक्रवारी संकेत दिले आहेत.
पक्षातर्फे लोकसभेचे माजी सदस्य आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाची कृष्णा बोस या नावाचाही या पदासाठी विचार केला जात असल्याचे संकेत पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिले आहेत.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली व उपराष्ट्रपतिपदासाठी हमीद अन्सारी यांच्या नावाला पाठिबा देण्याचे आवाहन केले. असे असले तरी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचे नाव ‘यूपीए’च्या शनिवारच्या बैठकीत उपराष्ट्रपतिपदासाठी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत ममता बॅनर्जी यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.
 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत तृणमूल काँग्रेसने म्हटले की, १९ जुलैला होणार्‍या मतदानाच्या आधी तीन दिवस आपला पक्ष या संदर्भात निश्चित भूमिका जाहीर करेल. पक्षाने आपल्या सर्व खासदार व आमदारांना १६ जुलै रोजी कोलकता येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.