नवी दिल्ली: कोंग्रेसच्या युवराजांना घराचा आहेर देऊन नंतर केन्द्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी सारवासारव केली तीच मुश्किली केन्द्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी मध्यमवर्गीयांवर तोंडसुख घेउन ओढवून घेतली आहे. मी मध्यमवर्गीयांचा उल्लेख केला नाही तर मी ‘आम्ही’ म्हणालो; असा केविलवाणा बचाव करण्याची वेळ त्याच्यावर आली.
महागाईच्या मुद्द्यावर सरकारची लाज राखायाची म्हणून चिदंबरम यांनी मंगळवारी मध्यमवर्गीयांवर आगपाखड केली होती. लोक पाण्याची बाटली किंवा आईसक्रीम घेण्यासाठी १५ रुपये खर्च करतील पण त्यांना गहू, तांदूळ रुपयाने महाग झालेला चालत नाहीं; अशी मल्लीनाथी करून चिदंबरम यांनी; प्रत्येक वेळी सरकार मध्यमवर्गीयांचा विचार करू शकत नाही; अशी तंबीही दिली.
त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्याचे राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य जनतेतही तीव्र प्रतिसाद उमटले. महागाईला आवर घालू न शकलेले सरकार आपले अपयश लपविण्यासाठी जनतेच्या माथी दोष मारून मोकळे होत असल्याची टिका झाल्यावर मात्र चिदंबरम यांनी शब्दच्छल करून आपली लाज वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतेच टोलचे समर्थन करताना दुचाकीला टोल नसल्याने टी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाना ‘फुकटे’ असे शेलके विशेषण वापरले होते.