फेसबुकचे भारतातील ऍप सेंटर उपयुक्त ठरणार?

नवी दिल्ली, दि. १२ – गेल्या काही वर्षांत सोशल नेटवर्किंग साईटमध्ये अव्वल स्थान पटकाविणार्‍या फेसबुकने भारतासह अन्य सहा देशांमध्ये ऍप सेंटर चालू केले आहेत. नेटिझन्सना विविध गेम्स आणि ऍप्स सुलभतेने शोधता यावेत, याच उद्देशाने ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केवळ फेसबुकसाठी ऍप्स विकसित करणार्‍यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच ही केंद्रे प्रामुख्याने काम करणार आहेत. मात्र भारतातील हे केंद्र खरेच उपयुक्त ठरेल का, असा प्रश्‍न विचारला जातो आहे.

अनेक नेटिझन्स त्यांच्या स्मार्टफोन्सवरून फेसबुक ऍक्सेस करत असल्यामुळे, त्याचाही लाभ उठविण्याचा फेसबुकचा प्रयत्न आहे. ही सेवा ऍपल आणि अँड्रॉईड प्रणालींवरील स्मार्टफोन्ससाठीही उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की अमेरिकेमध्ये गेल्या महिन्यात अशी केंद्रे सुरू केल्यानंतर, लक्षावधी ऍपस् उपलब्ध करून देता आले. वास्तविक फेसबुकतर्फे एकही ऍप तयार करण्यात येत नाही. ते केवळ फेसबुक वापरकर्त्यांना त्यांना हव्या असलेल्या ऍप स्टोअरकडे जाण्याचा मार्ग सुचवितात.

भारतातील अनेक यूजर्सचाही फेसबुकवर विविध प्रकारचे ऑनलाईन गेम्स खेळण्याकडे कल असतो. यूजर्सनी फेसबुकवर चिकटून राहावे, हाच त्यामागील उद्देश आहे. परंतु, फेसबुकने उपलब्ध करून दिलेले ऍप स्टोअर ते वापरतील का, हेच आता पाहावे लागेल.

परस्पर एखाद्या ऍप स्टोअरकडे धाडून देणे, अनेक युजर्सना मान्य होईलच असे नाही. कारण अशा ऍप स्टोअर्समध्ये एकदा प्रवेश केल्यानंतर, युजर्सनी विविध प्रकारचे ऍप विकत घ्यावेत यासाठी त्यांना प्रलोभन दाखविण्यात येते. आपल्याला विशिष्ट ऍप हवेच, अशी भावना यूजर्सच्या मनात निर्माण करणे फेसबुकला भाग पाडावे लागेल.

सध्या यूजर्सना फेसबुकच्या डाव्या बाजूला असलेल्या ऍप सेंटरच्या चिन्हावर क्लिक करावे लागते. यूजर्सच्या आवडीनुसार त्यांना हवे ते ऍप स्वीकारता येतील, अशी त्यामागची भावना आहे. एकदा त्या चिन्हावर क्लिक केल्यास युजर्सना ऍप स्टोअरमधून अशा पद्धतीने फिरविण्यात येते, की फेसबुकच्या पेजवरील घडामोडींपासून तो युजर वंचित राहतो.

ऍप स्टोअरच्या पानावर अनेक ऍपबाबत शिफारस केलेली दिसून येते. ही शिफारस युजरने आतापर्यंत वापरलेल्या ऍप्सवर आधारित असते. गूगलच्या यूट्यूबरही अशीच व्यवस्था आढळते. त्याशिवाय सर्वाधिक लोकप्रिय ऍप, सर्वाधिक पाहिले जाणारे आणि सर्वाधिक कल असणार्‍या ऍपचीही यादी आहे. परिणामी यूजरला नेमके काय हवे आहे, याचा शोध सहज घेता येतो.

Leave a Comment