गर्भश्रीमंत पती मिळविण्याचे ट्यूशन!

बीजिंग –  श्रीमंतच पती मिळावा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. परंतु, प्रत्येकीलाच ते साध्य होत नाही. मात्र, ज्या मुलींना असे पती मिळतात त्यापैकी बहुतेक जणी उर्वरित आयुष्य सुखा-समाधानात घालवतात. ही गोष्ट आहे एका चिनी महिलेची. तरुणपणात तिचेही हे स्वप्न होते आणि त्यात ती यशस्वीही झाली. तिचे कौतुक अशासाठी, की श्रीमंत पती मिळविण्याची युक्ती तिने स्वत:पुरती मर्यादित न ठेवता इच्छा असेल त्या तरुणींना शिकविण्याचा वसाच घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चक्क शिकवणी वर्गच सुरू केले आहेत!

चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडु या शहरातील सू फेई (व ४२) यांनी एका गर्भश्रीमंताला गटविले आणि त्याच्याशी विवाह केला. आता त्या शिकवणी वर्गात विवाहोत्सुक श्रीमंत मुलांना कसे शोधावे, त्यांची ओळख काढून त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये कसे सहभागी व्हावे आणि नंतर विवाहापर्यंत कशी मजल मारावी, याचे धडे त्या शिकवितात. त्यासाठी त्या तब्बल ८८,६१६ रुपये किंवा १० हजार युआन इतके शुल्क घेतात. या अभ्यासक्रमात श्रीमंत पती कसा गटवावा, याचेच प्रामुख्याने शिक्षण मिळते.

सू फेई या ३७ वर्षे वयाच्या असताना त्यांनी एका लक्षाधीशाशी विवाह केला. आता त्या ग्वांगडॉंग प्रांतातील शेन्झेन शहरात राहतात आणि तिथेच त्यांनी सात वर्षांपूर्वी वर्ग सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी १०० तरुणींनी त्यांच्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरले होते.

तुम्हाला श्रीमंत पती मिळवायचा असेल, तर त्याचे छंद काय आहेत हे जाणून घ्या. ते सातत्याने ज्या ठिकाणांना भेट देतात, त्या ठिकाणांची माहिती मिळवा आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या नेहमी नजरेस पडाल याची दक्षता घ्या.  अचानक भेट झाल्याचा आभास निर्माण करून त्यांची ओळख काढा आणि तुमचेही तेच छंद असल्याचे त्याला पटवून द्या, अशा खास टिप्स त्यांच्या वर्गात देण्यात येतात.

अन्य काही टिप्समध्ये, पहिल्या भेटीत बसण्याची अशी जागा निवडा की प्रकाशाची तिरीप तुमच्या पाठीमागून ३० ते ४५ अंशाने येईल याची काळजी घ्या. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक गोड दिसेल. हॉटेलमध्ये जेवणासाठी खूप महाग पदार्थ मागवू नका आणि महागड्या भेटवस्तूही स्वीकारू नका. श्रीमंत तरुणांची प्रामुख्याने शिक्षक, डॉक्टर आणि सरकारी सेवेत असणार्‍यांना पसंती असते. हवाई सुंदरी, पत्रकार आणि दुकानदार त्यांना आवडत नाहीत. एखादा श्रीमंत तरुण दोन वर्षांपासून तुमच्याबरोबर फिरत असला आणि तरीही लग्नाचा प्रस्ताव मांडत नाही, असे तरुण तुमच्याशी विवाह करण्यास उत्सुक नसतात.

एखाद्या श्रीमंत तरुणाशी विवाह झाल्यानंतर पहिल्या वर्षात उधळपट्टीबाबत संयम पाळा, असेही त्या विशेषत्वाने सांगतात. या वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या किती जणींना श्रीमंत पती मिळाले, हे मात्र हे वृत्त देणार्‍या चायना डेली न्यूजने दिलेले नाही.