अशोक चव्हाण समर्थकांना सोनियानी भेट नाकारली

नवी दिल्ली, दि.१२ – आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीतील पत घसरली असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात आहे. चव्हाण समर्थक बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले. मात्र सोनियांनी त्यांना भेट नाकरत महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटण्याचा सल्ला दिला.

आदर्श प्रकरणामुळे चव्हाण यांच्या वाट्याला राजकीय विजनवास आला. या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले अन्य दोन माजी मुख्यमंत्री हे सध्या केंद्रीय मंत्री असून आदर्श प्रकरणी ते एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत.

आदर्शप्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याची तसेच पक्षश्रेष्ठी पाठीशी उभे राहात नाहीत, अशी भावना चव्हाण समर्थक कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात तयार झाली. आदर्शची जागा ही राज्य सरकारचीच असताना काँग्रेस बोटचेपी भूमिका घेत असल्याबद्दल चव्हाण समर्थक नाराज आहेत. त्यासाठी ते काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार होते.