सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळली

मालवण –  गेली ३४६ वर्षे समुद्री लाटांशी झुंज देत मालवणच्या समुद्रात डौलाने उभ्या असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यास पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली असून, राणीची वेळ या भागातील तटबंदीला समुद्राच्या बाजूने भगदाड पडले आहे. अजस्र समुद्री लाटांच्या मार्‍यामुळे दक्षिण व पश्चिमेकडील तट हादरत असल्याने या बाजूने सागरी अतिक‘मणाची शक्यता निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रातील कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली. सव्वा तीनशे वर्षाहून अधिक काळ सागरी लाटांशी झुंज देणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी कमकुवत बनली असून, गेले आठ ते दहा वर्षे किल्ल्याची पडझड वाढली आहे. यावर्षीही पुरातत्त्व खात्याने किल्ल्यातील तटबंदीवरील फुटपाथचे काम केले. पश्चिमेकडील अर्धवट राहिलेल्या तटबंदीची काही प्रमाणात डागडुजी केली आहे.

मात्र पुरातत्त्व विभागाचे हे सर्व उपाय समुद्री संकटापुढे हतबल ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पश्चिमेकडील तटबंदी ढासळत चालली असून राणीची वेळ या भागात समुद्राच्या बाजूने पडलेले खिंडार रुंदावत चालले आहेत. यामुळे समुद्राची मोठी लाट आल्यास येथून समुद्राचे पाणी जोरदार प्रवाहासह आतमध्ये घुसण्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या तटबंदीला ३४६ वर्षे पूर्ण झाली. दक्षिण व पश्चिम बाजूकडून समुद्राच्या जोरदार लाटांच्या मार्‍यावेळी तटावर हादरे जाणवतात.

पावसाळ्यात समुद्र खवळल्याने किल्ल्यावर ये-जा करणारी बोट वाहतूक बंद आहे. यामुळे रहिवाशांचा तीन महिने बाह्य जगताशी संपर्क नसतो. सध्या किल्ल्यात दहा ते बारा रहिवासी असून या सर्वाना पावसाळ्याच्या कालावधीत संभाव्य सागरी अतिक्रमणामुळे जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अधुनमधून वीजपुरवठाही खंडित असतो, मोबाइललाही वारंवार रेंज मिळत नाही. अशा परिस्थितीत किल्ल्याच्या तटबंदीला मोठे भगदाड पडल्याने रहिवासी भयाच्या छायेखाली आहेत. मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण शहरासाठी संरक्षण कवच बनला असताना या संरक्षकासमोरच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Leave a Comment