
एखादा माणूस नव्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या दोघांचे व्यक्तिमत्व, कपडे, भाषा आणि देहबोली यावरून एकमेकांविषयी काही ठराविक मत तयार होत असते आणि पहिल्या भेटीत होणारे हे मत बहुतेक बरीच वर्षे कायम रहात असते. काही मानसशास्त्रज्ञ तर या पहिल्या भेटीला महत्व देतातच, परंतु अधिक खोलात जाऊन असेही सांगतात की, माणसाचे पहिले इंप्रेशन त्याला लोकांनी पाहिल्यानंतरच्या पहिल्या सहा सेकंदातच तयार होत असते. त्यामुळे प्रथमदर्शनी पडणारा प्रभाव हा विषय परस्पर संबंध आणि व्यापार, उद्योग यामध्ये सर्वाधिक महत्वाचा विषय झाला आहे आणि त्यातून निर्माण झाले आहे एक नवे शास्त्र अर्थात शास्त्रातूनच त्याला व्यवसायाचेही रूप आले आहे आणि व्यवसायाचे रूप आल्यामुळे करिअर संधी आणि प्रशिक्षण या दोन्ही आघाड्यांवर या व्यवसायामध्ये खूप काही घडायला लागले आहे.
