नवी दिल्ली दि. ११ – आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तसेच समाजवादी पक्षाने कॉग्रेस आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा लक्षात घेऊन काँग्रेसने समाजवादी पक्षाला खूष ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्याचाच पहिला भाग म्हणून उत्तरप्रदेशसाठी समाजवादीने केलेल्या विशेष पॅकेजची मागणी पूर्ण करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव जावेद उस्मानी आणि पीएमओ कार्यालयातील प्रमुख सचिव पुलोक चटर्जी यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा बैठक होऊन अनेक कळीचे निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते. यात उत्तरप्रदेशसाठी विशेष पॅकेज म्हणून १७ हजार कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली असल्याचेही वृत्त आहे.
मंजूर करण्यात आलेल्या या विशेष पॅकेजमध्ये महाकुंभसाठी ४०० कोटी, रेनवॉटर हार्वेस्टींगसाठी ९८८० कोटी, पिण्याच्या पाण्यासाठी ११०० कोटी, खेडोपाड्यातून पाईपलाईन टाकण्यासाठी वर्षाला ६०० ते ७०० कोटी पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. नऊ जिल्ह्यात विद्यापीठे स्थापन करण्यासाठी ४ हजार कोटी मंजूर करण्यात आले असून त्यात राज्य शासनाच्या फ्री लॅपटॉप योजनेचाही समावेश आहे.
उत्तरप्रदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नुकतेच गरीब आमदारांना वीस लाख रूपयांच्या गाड्या देण्याची टूम काढली होती मात्र सर्वच स्तरातून त्याला कडाडून विरोध झाल्याने ती रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे २२४ आमदार असलेल्या या विधानसभेतील १४० आमदार कोट्याधीश आहेत व त्यातील ९ जणांकडे दहा कोटी पेक्षा अधिक संपत्ती आहे. तरीही या राज्याला देण्यात आलेले हे विशेष पॅकेज २०१४ सालातल्या लोकसभा निवडणूकांत समाजवादीने काँग्रेसची पाठराखण करावी म्हणूनच दिले गेले असल्याची चर्चा आहे.