फॉर्च्यून मासिकाच्या २०१२ च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या पाचशे कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात भारतातील आठ कंपन्यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल व खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन कंपन्या पहिल्या १०० मध्ये समाविष्ट असून पहिल्या शंभरमध्ये येणारी रिलायन्स ही भारतातील पहिलीच खासगी क्षेत्रातील कंपनी आहे.
इंडियन ऑईल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने ८६,०१६ दशलक्ष डॉलर्सचा महसूल गोळा करून यादीत ८३ वे स्थान पटकाविले आहे. गतवर्षी ही कंपनी या यादीत ९८ व्या क्रमांकावर होती. रिलायन्स इंडस्ट्रीज ने ७६,११९ दशलक्ष डॉलर्सचा महसूल गोळा करून गतवर्षीच्या १३४ वरून ९९ व्या स्थानावर उडी घेतली आहे. भारत पेट्रोलियमने ४४,५८२ दशलक्ष डॉलर्स महसूल कमावला असून त्यांचे स्थान गतवर्षीच्या २७२ क्रमांकावरून २२५ वर आले आहे. हिदुस्थान पेट्रोलियमने गतवर्षीच्या ३३६ क्रमांकावरून २६७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ३६,९५० दशलक्ष महसूल कमावला आहे आणि गतवर्षीच्या २९२ क्रमांकावरून २८५ वे स्थान घेतले आहे.
अन्य कंपन्यात टाटा मोटर्सने ३४,५७५ दशलक्ष महसूल मिळवून ३१४ वे स्थान घेतले आहे. गतवर्षी हीच कंपनी ३५९ व्या क्रमांकावर होती. ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कंपनीने ३०,७४६ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळविला आहे आणि ते या यादीत ३५७ व्या क्रमांकावर आहेत. टाटा स्टीलने २७,७३९ दशलक्ष डॉलर्स महसूल गोळा करत या यादीत ४०१ वे स्थान मिळविले आहे.