अल कायदा पेक्षा लष्करे तैय्यबाच अधिक धोकादायक

अमेरिकेच्या ट्रेड सेंटरवर झालेला ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि मुंबईवरचा २६/११चा हल्ला करण्यार्‍या अल कैदा पेक्षा पाकिस्तानच्या लष्कर आणि आयएसआयच्या पाठिब्यावर बळकट असलेली लष्करे तैयबा हीच दहशतवादी संघटना अधिक धोकादायक असल्याचे मत सीआयएच्या माजी विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. ब्रूस रायडेल असे या विश्लेषकांचे नाव असून ते वॉशिंग्टन येथील  ब्रुकींग इन्स्टिट्यूटचे वरीष्ठ फेलो आहेत.

अमेरिकेवर झालेला ९/११ चा दहशतवादी हल्ला हा जगातील सर्वाधिक मोठा दहशतवादी हल्ला होता असे सांगून ते म्हणतात की मुंबईवर नोव्हेंबर २००८ मध्ये झालेला २६/११ चा हल्ला हा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा दहशतवादी हल्ला आहे. मुंबईतील अनेक जागी १० दहशतवाद्यांनी केलेल्या या भीषण हल्ल्यामागे लष्करे तैयबाचाच हात होता आणि भारताने नुकत्याच ताब्यात घेतलेल्या अबू जिंदाल उर्फ जबीउद्दीन अन्सारी याने दिलेल्या कबुलीजबाबामुळे या तपासात मोठाच ब्रेक थ्रू मिळाला आहे. अबू जिंदालने दिलेल्या कबुलीत मुंबई हल्लयात पाकिस्तानी आयएसआयचा थेट हात असल्याचे निष्पन्न झाले आहेच. वर्तमानपत्रातून येत असलेल्या बातम्या खर्‍या मानल्या तर अमेरिकेवरील हल्ल्यात ज्या अमेरिकनांचा बळी गेला त्यांच्या खुनासाठीही आयएसआयच जबाबदार आहे असा निष्कर्ष काढता येतो असे ब्रूस यांचे म्हणणे आहे.

अबूला पकडण्यात सौदीने जी भूमिका पार पाडली त्याविषयी बोलताना ते म्हणतात की सौदीची ही कामगिरी फार महत्त्वाची आहे. वास्तविक इस्लामाबाद आणि रियाधमध्ये जवळीक आहे तसे आयएसआयचे भक्कम संबंध सौदीत आहेत. मात्र आता सौदी लष्करे तैयबा विरोधात कृती करायला तयार आहे का हे पाहायला हवे. त्यांनी तसा पवित्रा घेतला तर या संघटनेला आर्थिक चणचण लवकरच जाणवू लागेल कारण सौदी आणि गल्फमधील पाकिस्तानीच या दहशतवादी संघटनांना आर्थिक पुरवठा करत असतात. लष्करे तैयबाचा पाकिस्तानात मुक्त वावर आहे आणि त्यांना आयएसआयची फूस आहे हे आता नव्याने सांगायला नको.

लष्करे तैयबाचे अस्तित्व जगभरात असून त्यात दक्षिण आशिया, पर्शियन गल्फ, युरोप, ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिकेचाही समावेश आहे.

Leave a Comment