नवी दिल्ली, दि. ९ – बनावट नोटा व्यवहारामध्ये येण्यास प्रतिबंध करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्लॅस्टिक नोटा आणण्याची पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. जयपूर, शिमला, भुवनेश्वर व इतर अशा पाच ठिकाणी प्रथम या नोटा दाखल करण्यात येणार असल्याचे आरबीआयने सोमवारी सांगितले.
प्लॅस्टिक नोटांमुळे बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल. यासाठी आम्ही सुरुवातीला पाचेक ठिकाणी, अशा नोटा व्यवहारात आणण्याचा विचार करत असल्याचे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी सांगितले. पथदर्शी योजनेनुसार, सुरुवातीला १० रुपये मूल्याच्या नोटा पाच क्षेत्रीय कार्यालयातून वितरित करणार आहे.
बनावट नोटांचे वाढते प्रमाण कमी करणे हा प्लॅस्टिक नोटा आणण्यामागे प्रमुख उद्देश असला तरी यामुळे कागदी नोटांच्या छपाईवर होणारा खर्च वाचणार आहे. तसेच या नोटा फाटून होणारे नुकसानही टळणार आहे.
साध्या नोटांच्या तुलनेत एक वर्षाऐवजी या नोटांचे पाच वर्षेएवढे सरासरी आयुष्यमान असणार आहे. तसेच कागदी नोटांपेक्षा या नोटा अधिक सुस्पष्ट असल्याने त्यांच्या बनावटीकरणाला वाव उरणार नसून, छपाईचाही खर्च कमी होणार आहे. मात्र त्याचवेळी याचा पर्यावरणावर कितपत परिणाम होऊ शकेल, याचाही अभ्यास केला जात आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, रोमानिया, बर्मुडा, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या देशांनीही प्लॅस्टिक नोटांचा अवलंब केला जात आहे.