मसाला डोसा जगातील ’टॉप टेन’ पदार्थ

मसाला डोसा… `अण्णा’ च्या गाडीवर उभे राहून, खोबर्‍याची चटणी दोन-तीनदा मागून घेत खायचा, एक झक्कास पदार्थ. आपल्यासाठी दैनंदिन परिचयाच्या, अन् म्हणूनच थोड्या दुर्लक्षित झालेल्या या मसाला डोशाला आता एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. कारण, या जन्मात खाव्याशा वाटणार्‍या जगातल्या `टॉप टेन’  पदार्थांच्या यादीत मसाला डोसा विराजमान झाला आहे.

खरे तर, `मरण्याआधी जगातला कुठला पदार्थ खायलाच हवा, असे तुम्हाला वाटते?’, या प्रश्‍नावर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल. वरण-भात-लिंबापासून ते चायनीज, इटालियन, थाई पदार्थांपर्यंत, प्रत्येक जण आपापल्या चवीनुसार `मस्ट टेस्ट’चा पदार्थ सांगेल. पण, खवय्यांनी खास पसंती दिलेल्या अव्वल दहा पदार्थांमध्ये दाक्षिणात्य मसाला डोशाला मानाचे स्थान मिळाले आहे. `हॅफिगटॉन पोस्ट’ या वृत्तपत्राच्या ट्रॅव्हलर्स ब्लॉगवर या पदार्थांची एक यादी झळकलेय आणि त्यात मसाला डोसाही आहे.

`संपूर्ण ताट झाकणारा, पेपर इतका पातळ, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून बनवलेला, गरम तव्यावर नाजुकपणे शिजवलेला, आत उकडलेल्या बटाट्याची भाजी, रस्सा आणि पातळ चटणीबरोबर अप्रतिम लागणारा पदार्थ’,  अशा शब्दांत या वेबसाइटवर मसाला डोशाचे वर्णन करण्यात आले आहे. मसाला डोशासोबतच चीनमधील पीकिंग डक, अमेरिकेतील बीबीक्यू रीब्स आणि जपानमधील तिपानयाकी या प्रसिद्ध पदार्थांचाही या यादीत समावेश आहे.
फ्रान्समध्ये गोगलगायीपासून बनवण्यात येणारा आणि शिंपल्यात वाढला जाणारा, मिलॅन्गी नावाच्या स्वादिष्ट चटणीत बटरमध्ये बनवल्या जाणार्‍या ऍस्कॅरॉगस या पदार्थाचाही या यादीत समावेश आहे. इटलीतील झुच्चीनी फुले, मलेशियातील लक्सा ही सी-फूड करी, थायलंडमधील सोम टॅम किंवा ग्रीन पपाया सॅलेड आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड पावलोवा हे पदार्थही अनेकांना मरण्यापूर्वी आवर्जून खायचेत.

एकाद्या ठिकाणची संस्कृती समजून घेण्यासाठी तिथले प्रसिद्ध पदार्थ चवीने चाखून बघण्यासारखा दुसरा मार्ग नाही, असा मंत्रही या वेबसाइटवर देण्यात आला आहे.

Leave a Comment