पाटणा दि.९- अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यास सुरुवात झाल्यापासून पूर्णपणे जमीनदोस्त होईपर्यंत तत्कालीन केन्द्रीय गृहसचिव माधव गोडबोले हे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना वेळोवेळी माहिती देत होते. मात्र, हे रोखण्यासाठी नरसिह राव किवा केन्द्रीय गृह मंत्रालयाने काहीही प्रयत्न केले नाहीत. हा आरोप आहे बिहार प्रदेश धार्मिक विश्वत मंडळाचे अध्यक्ष आचार्य किशोरजी कुणाल यांचे. कुणाल माजी आयपीएस अधिकारी असून केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांची त्या वेळी बदली झाली होती.
राव यांना जेव्हा बाबरी मशीद पाडली जात असल्याची माहिती देण्यात आली तेव्हा ते पूजा करीत होते व वास्तू जमीनदोस्त होईपर्यंत ते पूजा करीत होते, या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील दाव्यातील त्यांनी खंडन करून कुणाल म्हणाले की, सरकारी कागदपत्रानुसार, असे स्पष्ट होते की, राव हे केवळ सजगच होते असे नसून ते गोडबोले यांचे प्रत्येक फोन घेत होते. राव व गोडबोले यांनी वास्तू पाडणे थांबविण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.
ते पुढे म्हणाले की, अयोध्या व नजीकचा प्रदेश हा केंद्रशासीत म्हणून घोषित करावा, ही माफी सूचना अंमलात आली असती तर, बाबरी मशीदचे पतन टाळता आले असते. मात्र, निवडून आलेले कल्याणसिंह यांचे सरकार बडतर्फ करून तो प्रदेश केंद्रशासीत करण्यासाठी राव सरकारने कोणतीही पावले टाकली नाहीत.