पावसाळ्यात ‘मोबाईल’ वापरताना…

mobile

तापलेल्या मातीवर पावसाचे शिंतोडे उडाले आणि त्या सुगंधाने सारेच मुग्ध झाले… पण, पाऊस जोरजोरात कोसळू लागल्यावर मात्र सगळ्यांना लागलेली चिंता म्हणजे… माझा मोबाईल व्यवस्थित आहे ना? हाच…

नुकतेच भारतातल्या अनेक राज्यांत मान्सूनला सुरुवात झाली आहे. पण, त्यामुळे कित्येकांचा जिव्हाळ्याचा सोबती म्हणजे मोबाईलसाठी मात्र ही धोक्याची घंटा ठरली आहे. पावसाळ्यात बाहेर पडताना आपण आपला मोबाईलची योग्य काळजी घ्यायची विसरून जातो आणि मग… मोबाईलमध्ये थोडं जरी पाणी गेले तरी त्यामध्ये ‘मॉइश्चर’ जमून तुमचा सगळा फोन खराब होऊ शकतो. मोबाईलमध्ये पाणी तसेच राहिले, तर मात्र कचर्‍याच्या डब्यात टाकण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नसतो. किंवा अशा वेळी बॅटरी फुटून गंभीर इजा होण्याचीही शक्यता असते. ‘होत्याचे नव्हते झाले’ अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणूनच आम्ही देत आहोत फक्त पाच टीप्स ज्यामुळे तुमचा मोबाईल पावसाळ्यातही योग्यवेळी तुमच्या उपयोग पडू शकेल…

स्वस्त आणि मस्त प्लास्टिकची पिशवी
बर्‍याचदा रेल्वेत, रेल्वे स्टेशनवर किंवा बाजारात अनेक आकारांमध्ये मोबाईलकरिता प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध असतात. ट्रान्सपरन्ट आणि झिप असलेल्या या पिशव्यांमध्ये तुमचा मोबाईल टाका आणि निश्चिंत व्हा. या पिशव्यांमध्ये माईश्चर जमा होऊ नये म्हणून थोडंसे सिलिका जेलही त्यामध्ये टाकून ठेवू शकता. तेव्हा पावसाळ्यात घरातून निघताना निदान एक पिशवी तुमच्या बॅगमध्ये टाकण्यास विसरू नका.

कॉल्स घेणे टाळा
प्लास्टिकची पिशवीही तुमच्याकडे नसेल तर अशावेळी काय कराल? अशा वेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे कॉल घेणे आणि करणे टाळाच… अशावेळी टेक्स्ट मॅसेजेस करणेही धोक्याचे असते. खूपच महत्त्वाचे काम असेल तरच मोबाईल बाहेर काढा.

‘हॅन्डस् फ्री’चा वापर करा
तुम्हाला पावसाळ्यात बाहेर पडायचेय आणि कॉल्सही अटेन्ड करायचेत, तर सोपा पर्याय म्हणजे ‘हॅन्डस् फ्री’चा वापर… ब्लू टूथ किंवा हॅन्डस् फ्री वापरून तुम्ही तुमच्या फोनला पाण्यापासून वाचवू शकता.

मोबाईलमध्ये पाणी शिरले तर…
तुम्ही काय करता जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये पाणी शिरते? लगेच उघडून पाणी पुसण्याचा प्रयत्न करता ना!… तुम्हीही हेच करत असाल तर हे करणे ताबडतोब थांबवा. कारण मोबाईल उघडल्यानंतर पाणी जास्त आत शिरण्याची शक्यता असते. तसेच मोबाईल सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर करू नका. त्यामुळे तुमचा मोबाईल कामातून जाण्याशिवाय तुमच्या हातात काहीच उरणार नाही. मग काय कराल? तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकायचाय. नंतर मोबाईल फक्त काही तासांकरता सूर्यप्रकाश मिळेल अशा सुक्या जागेमध्ये ठेऊन द्या. किंवा सिलीका जेल असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोड्या वेळासाठी फोन ठेऊन द्या. त्यामुळे ओल्या मोबाईलमधून मॉईश्चर तात्काळ दूर होईल.

ओल्या फोनला चार्जिंग करणे टाळा
मोबाईल ओला असताना त्याला चार्जिंगला लावणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जुने किंवा खराब सॉकेटला असा मोबाईल चार्जिंगला लावत असताना शॉर्टसर्किट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. मोबाईलमध्ये पाणी शिरलेला असताना तो कधीही स्विच ऑन करू नका. त्यामुळे तो कायमचा खराब होईल.

Leave a Comment