नोकर्‍या बदलण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट

मुंबई दि.५-सर्वच क्षेत्रांना व त्यातही आयटी कंपन्यांना प्रशिक्षित स्टाफ कंपनी सोडून जाऊ नये यासाठी कांही काळापूर्वी सातत्याने प्रयत्न करावे लागत होते मात्र आता आर्थिक जागतिक मंदीचे संकट  व परिणामी नोकरभरतीत होत असलेली कपात यामुळे नोकरदार आहे त्याच नोकर्‍या टिकविण्यास अधिक प्राधान्य देत असल्याचे महाहायरिंग क्लब डॉट कॉम या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कांही दिवसांपर्यंत म्हणजे अगदी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंतही नोकर्‍या सोडणार्‍यांचे प्रमाण खूपच होते पण दुसर्‍या तिमाहीत हे प्रमाण पहिल्या तिमाहीतील २२ टक्कयांवरून १७ टक्क्यांवर आले असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. नोकर्‍यातील बदल किवा अॅट्रिशन हे साधारणपणे दुसर्‍या तिमाहीत अधिक असते व विमान वाहतूक, हॉस्पिटॅलिटी, आय टी, बँकींग व फायनान्स क्षेत्रातील कंपन्यात हे प्रमाण सर्वाधिक असते असेही या पाहणीत दिसून आले होते. मात्र यंदा देशातील व परदेशातील आर्थिक अनिश्चतता व अनेक कंपन्यांनी केलेली कर्मचारी कपात तसेच पुढे ढकललेली नोकरभरती याचा अनिष्ट परिणाम एकूण सर्वच क्षेत्रातील कर्मचार्‍यांना जाणवू लागला असून आहे तीच नोकरी जाणार नाही ना याच चिंतेने कमचारी सध्या ग्रासलेले आहेत.

महाहायरिंग डॉट कॉमने ११ विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही पाहणी केली होती. त्यात सर्वाधिक नोकर्‍या बदलाचे प्रमाण विमान वाहतूक व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्यात सर्वाधिक तर वाहनउद्योग उत्पादन क्षेत्रातील कंपन्यात सर्वात कमी असल्याचेही आढळले आहे.
———