किंग रॉजर फेडरर पुन्हा सर्वोच्च स्थानी

लंडन – स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने शानदार सर्ववॉली गेमचे प्रदर्शन करताना इंग्लंडच्या अँडी मुरेला 4-6, 7-5, 6-3, 6-4 ने पराभूत करून सातव्यांदा विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. या विजयासह त्याने अमेरिकेचा पीट सॅम्प्रास आणि इंग्लंडचा विल्यम्स रेनशॉ यांच्या प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनचे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. यासह त्याच्या नावे आता तब्बल 17 ग्रँडस्लॅम किताब लागले आहेत. फायनल मॅचचा निकाल तीन तास आणि 24 मिनिटांत लागला. विजयानंतर आनंदाच्या भरात फेडरर मैदानावर कोसळला. त्यानंतर पुन्हा उभे राहून त्याने मुरेची भेट घेतली.

या विजेतेपदाबरोबरच फेडररने एक कोटी साठ डॉलर बक्षीस रक्कम जिंकली. या विजयाबरोबरच नोवोन जोकोविचला मागे टाकून एटीपी क्रमवारीत जागतिक नंबर वनच्या सिंहासनावर फेडरर विराजमान. तसेच जागतिक क्रमवारीत नंबर वन बनण्याच्या सॅम्प्रासच्या 286 आठवड्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पहिल्यांदा विम्बल्डन फायनल खेळणारा मुरे विजयी होईल, असेही या सामन्यात एक वेळ वाटले. त्याने पहिल्या सेटमध्ये 6-4 ने विजय मिळवून आक्रमक सुरुवात केली. दुसºया सेटमध्येही त्याने आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, फेडररच्या अनुभवासमोर मुरेचा टिकाव लागू शकला नाही. तो पराभूत झाला.

पहिल्या सेटमध्ये फेडररचा 4-6 ने पराभव- पहिल्या सेटमध्ये मुरेने पहिल्या आणि नवव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून फेडररवर दबाव निर्माण केला. फेडररनेसुद्धा चौथ्या गेममध्ये मुरेचे सर्व्हिस ब्रेक करून सामना रोमांचक केला. मात्र, पूर्ण सेटमध्ये मुरेची तुफानी सर्व्हिस, फोरहँड रिटर्न आणि दमदार नेटड्रॉपने गुण मिळवले.

तीन गेमचा निर्णय ड्यूसने- सामना जसजसा पुढे जात होता तसतसा सामन्यांत दोघांचा संघर्ष वाढत होता. पाचवा, सहावा, आठवा गेम ड्यूसपर्यंत रंगला. अखेर आठव्या गेममध्ये 4-4 ने बरोबरी झाली. मुरेने यानंतर नवव्या गेममध्ये फेडररची सर्व्हिस ब्रेक केली आणि दहावा गेम जिंकून सेट 6-4 ने जिंकला. पहिला सेट 57 मिनिटे रंगला.

दुसºया सेटमध्ये फेडरर विजयी : दुसºया सेटमध्ये 4-4 अशी स्थिती झाल्यानंतर मुरेने सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी दवडली. तो ब्रेकपॉइंटपर्यंत पोहोचला. मात्र, ड्यूस झाले. त्याने अ‍ॅडव्हांटेजही घेतले. मात्र, फेडररने त्याला जिंकू दिले नाही. दुसरा सेट 54 मिनिटांत संपला.

तिसºया सेटमध्ये फेडरर 6-3 ने विजयी : 2-2 ची स्थिती झाल्यानंतर फेडररने 3-2 ने आघाडी घेतली. मात्र, सहाव्या गेममध्ये आठ वेळा ड्यूस आणि चार वेळा ब्रेकपॉइंटपर्यंत पोहोचल्यानंतर फेडरर सर्व्हिस ब्रेक करण्यात यशस्वी ठरला. फेडररने 4-2 ने आघाडी घेतली. या गेमध्ये फेडररने वॉली विनर मारून विजय मिळवला. त्याने आपल्या सर्व्हिसवर 5-2 अशी स्थिती केली. अखेरीस 6-3 ने 49 मिनिटांत हा सेट जिंकला.

चौथ्या सेटमध्ये रंगली टक्कर : चौथ्या सेटमध्ये मुरेने पुनरागमनाचे सर्व प्रयत्न केले. मात्र, फेडररने 4-4 अशा स्थितीनंतर 6-4 ने सामना जिंकला.

नंबर वनचे सिंहासनही मिळवले : गेल्या काही वर्षांत स्पेनचा राफेल नदाल आणि सर्र्बियाच्या नोवाक जोकोविच यांच्या थरारासमोर फेडरर संपला, असे बोलले जायचे. मात्र, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना फेडररने 17 व्या ग्रँडस्लॅमसह  पुन्हा नंबर वनचे सिंहासनही पटकावले आहे. तेही विम्बल्डनच्या थ्रील विजयानंतर…!!

हीरोची बरोबरी- मी माझा हीरो पीट सॅम्प्रासच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यामुळे मी खूप आनंदित आहे. अखेर 17 वे ग्रँडस्लॅम जिंकले.’’-

रॉजर फेडरर

रॉजर फेडररचे यश

करिअर विजेतेपद : 75

सामने विजयी : 847

सामने गमावले : 192

या वर्षी विजयी : 40 सामने

या वर्षी पराभव : 6 सामने

फेडररचे ग्रँडस्लॅम यश

ऑस्ट्रेलियन ओपन : 2004, 2006, 2007, 2010.

विम्बल्डन : 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012.

युएस ओपन : 2004, 2005, 2006, 2007, 2008.

फ्रेंच ओपन : 2009.

Leave a Comment