कला, वाणिज्य,विज्ञान शाखांनाही संधी

artcs

सध्या शिक्षणाच्या आणि नोकर्‍यांच्या क्षेत्रात काही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन शाखांचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अपेक्षांचे ओझे ठेवलेले असते. परंतु अशा प्रकारे जे विद्यार्थी या शाखांना प्रवेश मिळवू शकणार नाहीत असे त्यांच्या पालकांनाच वाटते ते पालक आपल्या मुलांना कला, वाणिज्य किंवा फार तर विज्ञान शाखेला घालून पुढे त्यांनी निदान बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशी एखादी पदवी मिळवावी अशी अपेक्षा करत असतात. साधारणपणे डॉक्टर, इंजिनिअर, आय.टी. प्रोफेशनल किंवा एम.बी.ए. होऊन व्यवस्थापक होतो तोच खरा करिअरिस्ट असे मानले जाते.

आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स या विषयांचे पदवीधर होणे म्हणजे करिअर नव्हे, असा एक मोठा गैरसमज शिक्षण क्षेत्रात पसरवण्यात आलेला आहे. पण थोडासा विचार केला आणि चौकशी केली तर निरुपयोगी समजल्या जाणार्‍या या शाखांचे विद्यार्थी सुद्धा चांगले करिअर घडवू शकतात, चांगल्या नोकर्‍या मिळवू शकतात आणि भरपूर वेतनही मिळवू शकतात असे लक्षात येते. आपल्या शिक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे माहिती तंत्रज्ञानात करिअर करण्यासाठी आणि भरपूर पगार मिळविण्यासाठी इंजिनिअर असण्याची गरज आहे. आय.टी. क्षेत्रात नाव कमवलेले बहुसंख्य लोक आधी इंजिनिअर असतात. त्यातले काही लोक आय.आय.टी.मधून बी.टेक. पदवी मिळवलेले असतात ही गोष्ट खरी. परंतु माहिती तंत्रज्ञानात करिअर करण्यासाठी इंजिनिअरिंग किंवा बी.टेक.चीच पदवी असली पाहिजे असा काही नियम नाही. सायन्सची पदवी असली तरी चालते हे लोकांना आता माहीत झाले आहे. परंतु आर्ट आणि कॉमर्सची पदवी घेऊन सुद्धा आय.टी. मध्ये करिअर करता येत असते हे लोकांना माहीतच नाही.

मात्र अनेक बड्या आय.टी. कंपन्यांमध्ये सी.ई.ओ. म्हणून काम करणारे अनेक लोक एम.ए. किंवा एम.कॉम. पदवी घेऊन या कंपन्यात आलेले असतात. तेव्हा बी.ए. आणि बी.कॉम. झालेल्या विद्यार्थ्यांनी आय.टी. करिअर आपल्यासाठी नाही हा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकावा.
सध्याच्या काळात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी इतकेच महत्व व्यवस्थापन शाखेलाही प्राप्त झालेले आहे आणि बी.कॉम. झालेले विद्यार्थी डी.बी.एम. किंवा एम.बी.ए. करून याही क्षेत्रात करिअर करू शकतात. शिवाय कंपनी सेक्रेटरीसारख्या नोकर्‍या कॉमर्स पदवीधरांना मिळवता येतात. कष्ट करण्याची तयारी असेल तर कॉमर्स पदवीधर चार्टर्ड अकौंटंट म्हणून, वकील म्हणून किंवा कर सल्लागार म्हणून व्यवसायही करू शकतात आणि नोकर्‍याही मिळवू शकतात. विज्ञान पदवीधरांसाठी विशेष करून अनेक शास्त्रांच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या संधीचे प्रचंड मोठे दालन खुले झालेले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे पदवीधर परदेशी भाषा शिकून याही क्षेत्रामध्ये चांगले करिअर करू शकतात.

परदेशी भाषा शिकण्यास बेसीक शिक्षणाची कसलीही अट नसते. त्यामुळे हे क्षेत्र या तिन्ही पदवीधरांसाठी खुले झालेले आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना एक चांगले क्षेत्र म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ. सध्याच्या जगात मानसोपचार तज्ज्ञांची फार टंचाई आहे आणि त्यांची गरज मात्र वेगाने वाढत आहे. अशा अवस्थेत मानसशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवून एखादा विशिष्ट पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून कोणालाही मानसोपचार तज्ज्ञ हा व्यवसाय करता येतो. आपल्या जीवनामध्ये अशी अनेक कौशल्ये आहेत की, ज्यांच्या शिक्षणासाठी बी.ई. किंवा बी.टेक. असण्याचीच अट नाही. पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, सनदी अधिकारी, बँकांतील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी अशा शेकडो रोजगार संधी बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. 

Leave a Comment