कर्नाटकातली खांदेपालट

कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या हाती सत्ता आली असताना राजकीय स्थैर्य देण्याच्या ऐवजी तीन वर्षात तीन मुख्यमंत्री बदलून आपणही याबाबत कॉंग्रेसपेक्षा वेगळे नाही हे दाखवून दिले आहे. आता आता स्थिती उलट झाली आहे. कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री बर्‍यापैकी स्थिर झाले आहेत आणि भाजपानेच आपल्या हातात असलेल्या राज्यांत संगीत खुर्चीचा खेळ जोरात सुरू केला आहे. आता  माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या दबावाला बळी पडूनच केवळ सदानंद गौडा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे आणि त्या ठिकाणी येडीयुरप्पा यांच्या पसंतीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना बसवले आहे. हा बदल अचानकपणे झाला. ध्यानी मनी नसताना झाला. कॉंग्रेसच्या हातात असलेल्या राज्यात असे होतात तेव्हा भाजपाचे नेते त्यावर टीका करतात आणि  कॉंग्रेसला धड एक मुख्यमंत्री देता येत नाही अशी टिपण्णी करतात. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांना बदलून एकदा सुशीलकुमार शिंदे यांना आणले आणि नंतर असेच दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बदल करून अशोक चव्हाण यांची वर्णी लावली. पण नंतर त्यांनाही अचानकपणे आदर्श प्रकरणात बदलून दुसरे चव्हाण नेमले.

असे बदल झाले की भाजपाचे नेते कॉंग्रेसवर टीका करतात पण आता भाजपावरच ही पाळी आली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून येडीयुरप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पण नंतर आणलेल्या सदानंद गौडा यांना जेमतेम ११ महिनेही दिले नाहीत. ताबडतोब बदलून टाकले. गौडा यांचे हे ११ महिनेही सुखाने पार पडले नाहीत. पहिले सहा महिने त्यांना शांततेचे लाभले; पण या काळात येडीयुरप्पा यांना असे दिसायला लागले की हे गौडा काही आपल्या ओंजळीने पाणी पीत नाहीत. आपल्या सांगण्यानुसार कारभार करीत नाहीत. त्यामुळे येडीयुरप्पा चवताळले. त्यांनी राजीनामा दिला असला तरीही राजकारणावर त्यांचेच वर्चस्व हवे आणि मुख्यमंत्री कोणीही असला तरीही सूत्रे त्यांच्याच हातात असावीत असा त्यांचा हट्ट होता. तो काही गौडा पूर्ण करीत नाहीत असे दिसायला लागताच येडीयुरप्पा यांनी सदानंद गौडा यांच्या आसनाखाली सुरुंग पेरायला सुरूवात केली. नेतृत्वबदलाची मागणी लावून धरली. पक्षात त्यासाठी बंडखोरी निर्माण केली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुरूवातीला त्यांना दाद दिली नाही पण त्यांनी आपल्या बंडाला व्यापक रूप द्यायला सुरूवात केली आणि शेवटी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यापुढे नमते घेऊन नेतृत्व बदल केला.

आता मुख्यमंत्री होत असलेले जगदीश शेट्टर हे ५६ वर्षांचे असून लिंगायत समाजाचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. ते ११ तारखेला शपथ घेतील. श्रेष्ठींनी राज्यात नेतृत्वबदल करून लिंगायत नेत्याला मुख्यमंत्री केले आहे त्या अर्थी राज्यातली आपली लिंगायत मतपेढी कायम राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. २०१३ सालच्या सुरूवातीला राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. तिचा विचार करून पक्षाने हा बदल मान्य केला आहे. कर्नाकातले राजकारण लिंगायत आणि वक्कलीग या दोन जातींच्या भोवतीच फिरत असते, कारण हे दोन्ही समाज तिथे मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांचा राजकारणावर प्रभाव आहे. या दोन्ही जाती व्यापार आणि शेतीत आघाडीवर असून चांगल्याच धनाढ्य आहेत. म्हणून त्यांना सांभाळून राजकारण करील तो पक्ष तिथे राज्य करील असे म्हटले जाते. या दोन जातीतील लिंगायत जात भाजपाच्या बाजूने कललेली आहे.  कारण भाजपाने सत्ता हाती येताच येडीयुरप्पा यांच्या रूपाने या समाजाला नेतृत्वाची संधी दिली आहे. तिचा प्रभाव या जातीवर आहे. सदानंद गौडा यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. खरे तर त्यांनी गेले ११ महिने  चांगला कारभार केला होता. त्यांनी आपल्या कामात काही कमतरता ठेवली आहे म्हणून त्यांना कमी केले आहे असे नाही.
केवळ जातीय राजकारणाचा एक भाग म्हणून एका चांगल्या मुख्यमंत्र्याला बदलण्यात आले आहे.

गेली काही वर्षे भाजपाचे नेते केवळ विकासाचे राजकारण करण्यावर भर देत आहेत. गुजरातेत नरेन्द्र मोदी, मध्य प्रदेशात शिवराजसिंह आणि छत्तीसगड मध्ये रमणसिंग या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचेच राजकारण केले आहे आणि त्यामुळे तिथे भाजपाला दोनदा विजय मिळाले आहेत.  असे असताना कर्नाटकात विकासाचे राजकारण करणारा मुख्यमंत्री बदलावा लागला आहे. तसा तो बदलला नसता तर भाजपाची दक्षिण भारतातली प्रतिमा चांगली झाली असती आणि तिथे पक्षाला चांगले पाय रोवता आले असते पण येडीयुरप्पा यांच्या धमक्यांपुढे पक्षाला झुकावे लागत आहे. येडीयुरप्पा यांनी नेतृत्वबदल केला नाही, तर राज्यातल्या लिंगायत समाजाचा पाठिंबा भाजपाला मिळणार नाही असे बजावले आहे आणि पक्षश्रेष्ठींना ते खरे वाटले. आताच्या राजकारणात जातीय समीकरण हे वास्तव आहे. पण त्याच्या पुढे किती नमते घ्यायचे यालाही काही मर्यादा असली पाहिजे. पक्षाची विकासात्मक प्रतिमा बळकट होत असताना अशी जातीय तडजोड तर अजिबात करायला नको होते.

Leave a Comment