इन्स्टंट जमान्यात गुरू झालेत ऍटींक पीस : अजित पवार

पुणे, दि. ६ – मोबाईल, संगणक, टॅब्लेट ही गॅझेटस् आजच्या तरुणाईचे स्टेटस सिंबॉल बनले आहेत. या इन्स्टंट जमान्यात गुरू अँटीक पीस झाले आहेत. चांगलं करायला देणारी प्रेरणा म्हणजे गुरू असते. मात्र आज फक्त पैशाच्या माध्यमातून शिक्षण मिळू शकते, असा समज पसरत चालला आहे. हा समज दूर होऊन गुरू – शिष्याचे नाते अधिक गहिरे व्हावे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित गुरूजन गौरव समारंभात  पवार यांच्या हस्ते पाच ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ऍड. वंदना  चव्हाण होत्या.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले आणि सामाजिक कार्यकर्ते विजयकांत कोठारी यांचा पुणेरी पगडी, मोत्याची माळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गॉड पार्टीकल मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारी भारतातील तरुणाई त्याच आनंदाने गुरूपौर्णिमा साजरी करते, अनोखा संगम फक्त भारतीय संस्कृतीमध्येच दिसू शकतो. परंतु आज सर्वच क्षेत्रात काही अपप्रवृत्ती पसरत चालल्या आहेत. शिक्षणासारखे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. यामुळेच युवापिढीच्या मते गुरू ही संकल्पना आउटडेटेड झाली आहे. गुरू – शिष्याचे पवित्र नाते अशा टप्प्यावर का पोहचले आहे याचा विचार समाजातील सर्वच घटकांनी करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देतांना बी. के. एस. अय्यंगार म्हणाले, ज्या काळात योगाला फारसे महत्व दिले जात नव्हते, अशा काळात मला पुणेकरांनी आधार दिला. पुणे ही माझी मातृभूमी आहे. ४० देशांमध्ये १५ लाखांहून अधिक माझे शिष्य आहेत आणि ते मला पुण्याच्या नावाने ओळखतात याचा अभिमान आहे.

डॉ. ताकवले म्हणाले, शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची आवश्यकता असून इंग्रजी माध्यम व ई – लर्निंगचा विचार होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाबरोबरच २१ व्या शतकातील शिक्षण ज्ञानाधिष्ठीत व्हावे असे त्यांनी सांगितले.

प्रा. मिरासदार म्हणाले, माझे विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत याचा आनंद होतो. माणसाला अध्यात्म, तत्वज्ञान आणि विनोद या तीन गोष्टी दुःखापासून दूर नेतात. मात्र पहिले दोन मार्ग सर्वांना झेपतील असे नसतात यामुळे मी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी विनोदाचा मार्ग स्विकारला.

डॉ. माशेलकर म्हणाले, मला गणितात ९७ गुण मिळाले असतानाही ३ गुण कुठे गेले असे विचारणारी माझी अडाणी आई माझी गुरू आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काही शिकायला मिळते. ती प्रत्येक व्यक्ती आपला गुरू असतो. यामुळे गुरूची संकल्पना विस्तारीत करण्याची आवश्यकता आहे.