आदर्शप्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआय अधिकार्‍याची बदली

मुंबई दि.६ – आदर्श सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करणार्‍या सीबीआयने आरोप पत्र दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी ऋषिराज सिंग यांची बदली करण्यात आली आहे. ऋषिराज हे सीबीआयच्या मुंबई विभाग-१ चे जॉईन्ट डायरेक्टर असून आता त्यांची बदली करून त्यांच्याकडे मुंबई विभाग-२ ची सूत्रे सोपविण्यात आलेली आहेत. सीबीआयने मात्र ही बदली ‘रुटीन’ असल्याचा खुलासा केला आहे.

सीबीआयच्या अधिकार्‍याने सांगितले की, खात्यांतर्गत बदल्या आम्ही दर चार वर्षांनी करीत असतो. ऋषिराज यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला होता. सीबीआयने बुधवारी आदर्श गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ऋषिराज सिग यांची बदली करण्यात आली. सध्या नवी दिल्लीत असलेले केशवकुमार हे आता सिंग यांच्याकडून येत्या २० दिवसांत सूत्रे स्वीकारतील. जॉईट डायरेक्टर पी. कंदस्वाम वैद्यकीय रजेवर गेले होते, तेव्हा कुमार यांच्याकडे झोन-२ चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

आदर्श गैरव्यवहारात निवृत्त व सनदी अधिकार्‍यांचा कसा हात होता याची चौकशी करणार्‍या तपास पथकाचे ऋषिराज हे प्रमुख होते..