सुरक्षा सेवा

सध्या उद्योगांची वाढ वेगाने होत आहे आणि प्रत्येक उद्योगाला सुरक्षा सेवक आवश्यक झाले आहेत. बहुतेक उद्योग स्वत:ची सुरक्षा व्यवस्था निर्माण करत नाहीत. बाहेरून एखाद्या सुरक्षा कर्मचारी विषयक संस्थेशी संपर्क ठेवून सुरक्षा गार्ड मागवले जातात. त्यामुळे सुरक्षा गार्डाचा पुरवठा करणे आणि विविध संस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय झालेला आहे. विशेषत: आजच्या काळामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे सुरक्षा गार्डांची गरज प्रत्येक लहान-मोठ्या व्यवसायाला सुद्धा जाणवायला लागलेली आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांमध्ये हजारे तरुणांना सुरक्षा गार्ड ही एक रोजगार संधी उत्तमरित्या तयार झालेली आहे.

सुरक्षा गार्डाची नोकरी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेच असे नाही. मात्र लष्करामध्ये किंवा निमलष्करी दलांमध्ये काम केलेल्या जवानांना अशी कामे मिळू शकतात. अशा दलातले जवान साधारण पस्तीशी ते चाळीशीच्या आतच निवृत्त होत असतात आणि त्यांना निवृत्तीनंतर काय, हा प्रश्‍न भेडसावत असतो. अशा लोकांना ही नोकरी चांगली आहेच, परंतु तेवढ्यावर गरज भागत नाही म्हणून विविध प्रकारचे अव्यावसायिक अभ्यासक्रम केलेले म्हणजे बी.ए., बी.कॉम. झालेले अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. सुरक्षा गार्ड म्हणून काम करणारा तरुण चपळ, सावध आणि थंड डोक्याचा असण्याची गरज असते. काही वेळा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. अशावेळी धैर्याने काम करण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे. रात्रपाळीत काम करण्याची क्षमताही हवी. हे झाले सुरक्षा गार्ड म्हणून काम करणार्‍या उमेदवारांविषयी.

मात्र या क्षेत्रामध्ये थोडे प्रगत काम करू शकणारे तरुण सुरक्षा गार्ड एजन्सी काढू शकतात आणि आपल्याकडे अशा गार्डांची भरती करून विविध संस्था, संघटना आणि कंपन्यांना सुरक्षा गार्डांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करू शकतात.मात्र काही मुक्त विद्यापीठांनी सुरक्षा गार्ड संघटन किंवा व्यवस्थापक या कामांसाठी सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम काढलेले आहेत आणि विद्यापीठातर्फे पुरवल्या जाणार्‍या पुस्तकांचा अभ्यास करून दहावी पास झालेला कोणीही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.  फारसे भांडवल न गुंतवता करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.

Leave a Comment