राहुलला खेलरत्न तर युवराजला अर्जुन पुरस्काराची शिफारस

मुंबई, दि. ७ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ‘द वॉल’ राहुल द्रविडची ‘राजीव गांधी खेलरत्न’ आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून सावरलेला अष्टपैलू युवराज सिंगची ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे मुख्य प्रशासकी अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी शनिवारी ही माहिती दिली.

‘‘प्रतिष्ठेच्या ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी अनुक्रमे माजी सवरेत्तम फलंदाज द्रविड आणि युवराजचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र १६ जुलैला मुंबईत होणार्‍या बीसीसीआयच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाला संबंधित नावे कळवली जातील,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.

क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या अंतिम तारखेवरून बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालयात वाद झाला. मात्र क्रीडा मंत्रालयाने एक पाउल मागे घेत क्रीडा पुरस्कारासाठी शिफारशीची मुदत २० जुलैपर्यंत वाढवली. बीसीसीआयनेही क्रीडा पुरस्कारांसाठी नावे देण्याची तयारी दर्शवल्याने सदर वाद निकालात निघाला आहे.

Leave a Comment