पंतप्रधान ’अन्डरऍचिव्हर’, मोदीं ’हिरो’

नवी दिल्ली, दि. ८ – `टाईम मॅगझिन’ने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळविणारे अर्थात `अन्डरऍचिव्हर’ व्यक्ती म्हणून उल्लेख केला आहे. मनमोहन सिंग यांना एका अर्थाने `टाईम’ने झिरो ठरविले आहे. तर नरेंद्र मोदी यांना `चतूर राजकारणी’ असा उल्लेख करुन `हिरो’ बनविले आहे.

`टाईम’च्या ताज्या अंकात मनमोहन सिंग यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मंदावलेला विकास दर, आर्थिक सुधारणा आणि धोरणांची अंमलबजावणी न करण्यात आलेल्या अपशावरुन होत असलेल्या आरोपांचा ते सामना करु शकतील का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. युपीए-२ सरकारवर कडाडून टीकाही करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींवरुन जनतेचा विश्‍वास उडाला आहे. जनतेच्या हिताचे आणि रोजगार निर्मिती करणारे कायदे संसदेत अडकले आहेत. हे निश्चित चिंताजनक आहे.

ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावरच पंतप्रधानांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. गेल्या वर्षी `टाईम’ने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापले होते. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. कॉंग्रेसच्या राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात, असे त्यावेळी म्हटले होते. तर ३ वर्षांपूर्वी `टाईम’ने मनमोहन सिंग यांचा गौरव केला होता. लाखो नागरिकांचे आयुष्य बदलविणारा व्यक्ती म्हणून `टाईम’ने त्यांचा उल्लेख केला होता.

Leave a Comment